( रत्नागिरी )
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध आरे समुद्रकिनारी आज (मंगळवारी) दुपारी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत सहलीसाठी आलेल्या कोल्हापूर येथील १७ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या विद्यार्थ्याचा जीव स्थानिकांच्या तत्परतेमुळे वाचवण्यात यश आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत विद्यार्थ्याचे नाव अतुल रघुनाथ सुतार (वय १७, रा. कोल्हापूर) असे असून मयूर विष्णू खाडे (वय १६, रा. कोल्हापूर) याला सुखरूप बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथील एका खासगी शिकवणी वर्गातील ४१ विद्यार्थी शिक्षकांसह सहलीसाठी रत्नागिरीत आले होते. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हे विद्यार्थी आरे समुद्रकिनारी समुद्रस्नानासाठी उतरले होते. यावेळी अतुल सुतार हा समुद्रात पोहत असताना किनाऱ्यापासून अधिक आत गेला. त्याला परत बोलावण्यासाठी त्याचा मित्र मयूर खाडे त्याच्या मागोमाग गेला. मात्र समुद्रातील तीव्र प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात अडकून बुडू लागले.
दोघे विद्यार्थी बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या सहकाऱ्यांनी आरडाओरड सुरू केली. विद्यार्थ्यांचा आवाज ऐकून घटनास्थळी उपस्थित असलेले ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी प्रदीप पाटील तसेच झीप लाईनचे कर्मचारी सुरज चव्हाण, आदित्य पाटील, संस्कार साळवी, अजय मांजरेकर आणि महेश साळवी यांनी तत्काळ समुद्रात धाव घेत बचावकार्य सुरू केले.
जीवाची पर्वा न करता केलेल्या प्रयत्नांमुळे दोन्ही विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र अतुल सुतार याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. तर मयूर खाडे याला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील आदेश कदम यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य आणि आवश्यक समन्वय केला. दरम्यान, मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली असून ते रत्नागिरीकडे रवाना झाले होते.
उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि विद्यार्थी सहलीसाठी येत असताना समुद्रातील प्रवाह, भरती-ओहोटी आणि सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास अशा दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे समुद्रस्नान करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

