(पुणे)
पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवर रविवारी पहाटे भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. आज पहाटे सुमारे चार वाजता कामशेतजवळील पुणे लेनवरील किलोमीटर ६८ परिसरात हा अपघात झाला.
पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने मधील बॅरियर ओलांडत थेट विरुद्ध लेनमध्ये प्रवेश केला आणि मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. धडकेच्या तीव्रतेमुळे ट्रक कारच्या पुढील भागावरच उलटला. त्यामुळे कार पूर्णपणे चक्काचूर झाली.
या अपघातात कारमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ट्रकचालकाचाही अपघातात मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघातानंतर मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या लेनवरील वाहतूक जवळपास दीड तास ठप्प झाली. तब्बल दहा किलोमीटरपर्यंत वाहनांची लांबलचक रांग लागली होती. अपघातग्रस्त वाहने कडेला हलवल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून, ट्रक चालकाचा ताबा सुटल्यानेच हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

