(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहर पोलिसांनी दिलेल्या स्पष्ट निर्देशांकडे दुर्लक्ष करून परराज्य व परदेशातील खलाशांची अनिवार्य पोलिस पडताळणी न करता त्यांना रोजगार दिल्याप्रकरणी एका बोट मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरकरवाडा जेटीसमोरील समुद्रात अंदाजे एक नॉटिकल मैल अंतरावर बुधवारी (१९ नोव्हेंबर) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
गुन्हा दाखल झालेल्या बोट मालकाचे नाव अजगर अब्दुल लतीफ कोतवडेकर (रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे आहे. शहर पोलिसांनी ३० सप्टेंबर २०२५ रोजी जेटींवरील सर्व बोट मालकांना विशेष सूचना देत, बोटींवर कार्यरत असणाऱ्या परराज्यातील आणि परदेशी खलाशांची पोलिस पडताळणी अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले होते. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होईल, असा लेखी आदेशही देण्यात आला होता.
मात्र कोतवडेकर यांनी हा आदेश धाब्यावर बसवून आपल्या दोन बोटींवर तब्बल आठ खलाशांना कोणतीही पडताळणी न करता कामाला ठेवले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांच्या आदेशाची विटंबना करत ते खलाशांकडून मासेमारी करून घेत असताना तपास पथकाच्या हाती ते समुद्रातच सापडले. या प्रकारानंतर शहर पोलिसांनी संबंधित बोट मालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

