( मुंबई )
ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रचारामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक लढवण्याची तयारी करत असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी प्रचार सुरू केला असून, त्यांच्या बॅनर आणि सोशल मीडियावरील पोस्टमध्ये दिवंगत पती अभिषेक घोसाळकर यांचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे.
तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना UBT सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र उमेदवारी अधिकृत जाहीर होण्यापूर्वीच प्रचार सुरू केल्याने आणि त्यात अभिषेक घोसाळकर यांचा फोटो वापरल्याने वाद चिघळला आहे. शिवसैनिकांनी सोशल मीडियावरून या प्रचारावर जोरदार टीका केली आहे.
शिवसेना UBT नेते सचिन आहिर यांनी सांगितले की, अभिषेक घोसाळकर शेवटपर्यंत शिवसेनेत होते. त्यामुळे तेजस्वी घोसाळकर यांनी प्रचार करताना मतदारांसमोर स्वतःची ओळख आणि भूमिका स्पष्ट करावी. प्रचार बॅनरवर भाजपच्या नेत्यांचे फोटो वापरण्याचा सल्लाही UBT कडून देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात शिंदे गटाच्या शिवसेनेने तेजस्वी घोसाळकर यांची पाठराखण केली आहे. नवऱ्याचा फोटो वापरण्यावर आक्षेप घेणे चुकीचे असल्याचे सांगत, शिवसेना UBT खालच्या पातळीचे राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या आरोपांना उत्तर देताना शिवसेना UBT नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. संजय शिरसाटांनी UBT ला शिकवण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाची शिवसेना सोडल्याने अनेक शिवसैनिक नाराज असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रचार पोस्टर्सना विरोध होत असल्याचे बोलले जात आहे. आगामी निवडणुकीत तेजस्वी घोसाळकर यांना आव्हान देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आतापासूनच रणनीती आखल्याचे संकेत या वादातून मिळत आहेत.

