(सिंधुदूर्ग)
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असून २ डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी प्रचाराची गती वाढवली असताना सिंधुदुर्गात पुन्हा एक मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते निलेश राणे आणि शिवसेना (ठाकरे गट) आमदार वैभव नाईक पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.
वैभव नाईक यांची निवडणूक आयोगाकडे थेट मागणी
ठाकरे गटाचे नेते आणि आमदार वैभव नाईक यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून निलेश राणे यांच्या पोलीस संरक्षणात कपात करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, निलेश राणेंना गरजेपेक्षा जास्त पोलीस संरक्षण देण्यात आले असून सध्या लागू असलेली निवडणूक आचारसंहिता लक्षात घेता हे संरक्षण मतदारांवर अनावश्यक दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
नाईक यांच्या आरोपानुसार, निलेश राणे वाय आणि एस स्कॉर्ट श्रेणीच्या पोलीस संरक्षणाचा वापर मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी करीत आहेत. संरक्षणामुळे निर्माण होणारी ‘क्रेझ’ व प्रभावामुळे निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होत आहे. राणे यांच्या ताफ्यानंतर पोलीस वाहनांचे सायरन विनाकारण वाजवले जातात, ज्यामुळे ग्रामस्थांना त्रास होतो. ग्रामीण भागातील अरुंद रस्त्यांवर ताफा गेल्याने वाहतूक कोंडी तयार होते. यामुळे निलेश राणेंना दिलेले अतिरिक्त पोलीस संरक्षण तात्काळ कमी करावे, अशी स्पष्ट मागणी नाईक यांनी आयोगाकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
निवडणूक जवळ येत असतानाच ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने येत असल्याने सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

