(सिंधुदुर्ग)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप–शिवसेना महायुती तुटल्यानंतर त्यामागचे कारण काय, याबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत. या चर्चांना अखेर पूर्णविराम देत शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना जबाबदार धरलं आहे. “सिंधुदुर्गात महायुती रवींद्र चव्हाण यांच्यामुळे तुटली. त्यांना सिंधुदुर्गाशी काय वैर आहे, हे समजत नाही”, असे शब्दांत निलेश राणे यांनी हल्लाबोल केला आहे.
२ डिसेंबरला होणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पूर्ण कोकणात महायुती होणार, अशी अपेक्षा होती. मात्र, अंतिम क्षणी युती न झाल्याने कोकणात थेट भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) अशी लढत होणार आहे. युती न झाल्यानंतर कोकणात एका वेगळ्या आघाडीची निर्मिती करण्यात आली असून “शहर विकास आघाडी” नावाच्या या आघाडीत शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत विरोधी महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी यांचाही समावेश आहे.
शहर विकास आघाडीच्या प्रचारासाठी आले असताना निलेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधत युती का तुटली, याबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, “वरिष्ठ नेतृत्वाने युती रोखली नाही. माहिती घेता असं समजलं की युती तुटण्यामागे कारण फक्त प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आहेत. रत्नागिरीत जागांची समन्वयाने वाटणी झाली. मग सिंधुदुर्गालाच विरोध का?”
राणे पुढे म्हणाले की, “मालवणमध्ये आम्ही १० जागा द्यायला तयार होतो. सावंतवाडीत दीपक केसरकर 50-50 फॉर्म्युल्यासाठी तयार होते. कणकवलीत एक-दोन जागा लढवाव्या लागतील, असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. तरीही आम्ही युतीसाठी तयार होतो.”
राणे यांनी बॅनरवरून फोटो काढण्याबाबतही नाराजी व्यक्त केली. “आमचा फोटो काढला तरी चालला असता, पण एकनाथ शिंदे यांचे फोटो बॅनरवरून काढून टाकले. हे आम्हाला दुखावणारं होतं.” युती तुटण्यासोबतच राणे यांनी आणखी एक आरोप केला की भाजपचे प्रदेशाध्यक्ष तीन दिवस सिंधुदुर्गात थांबून काही ‘विशेष’ बैठका घेतल्या. प्रदेशाध्यक्ष एवढ्या मोठ्या पदावर असून तीन दिवस सिंधुदुर्गात बसणं ही साधी गोष्ट नाही. त्यांनी नेमकं काय ठरवलं, ते शेवटी सांगीन, असे त्यांनी सूचक विधान केले.
दरम्यान, “असं असलं तरी राणे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, असं ठरवलं होतं. त्यामुळं राणेंनीच आम्हाला सांगितलं की, तुम्ही आता थांबू नका. कारण तुमचे दिवस फुकट जातील. त्यानंतरच स्वबळासाठी आम्ही मैदानात उतरलो. आम्ही चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांचं काम पाहिलं आहे. त्यांनी या पदाला किती उंचीवर नेलं, हे आम्ही पाहिलं. आपण केवळ दोन-तीन जिल्ह्यांचं राजकारण करू नये, हेच सांगण्याचा प्रयत्न होता. महायुती का नको याचेही कारण अद्याप समजलेलं नसून त्याच कारण रविंद्र चव्हाण सांगू शकतील”, असेही निलेश राणे म्हणाले.
सिंधुदुर्गातील महायुती तुटल्यानंतर स्थानिक राजकारण अधिक तापलं असून आगामी निवडणुकीत अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळणार आहेत.

