( मुंबई )
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) मुंबई युनिटने ‘फेअरप्ले’ (Fairplay) बेटिंग ॲप प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) ईडीने कंपनीची सुमारे 307.16 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून, ही मालमत्ता दुबईमध्ये आहे. यामध्ये बँक खात्यातील रक्कम, फ्लॅट्स, विला आणि जमीन यांचा समावेश आहे.
फेअरप्ले ॲपवर बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजी आणि अनधिकृत प्रक्षेपण केल्याचा आरोप आहे. मुंबईतील एका मीडिया कंपनीने सायबर पोलीसांत एफआयआर दाखल केल्यानंतर चौकशी सुरू झाली. कंपनीने या ॲपमुळे १०० कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर देशभरात अनेक फेअरप्ले विरोधी एफआयआर दाखल झाले आणि प्रकरणाची चौकशी ईडीकडे सोपवण्यात आली.
तपासात समोर आले आहे की कृष लक्ष्मीचंद शाह हा फेअरप्ले बेटिंग ॲपचा मुख्य सूत्रधार आहे, जो दुबईतून संपूर्ण नेटवर्क चालवत होता. त्याने दुबई, कुराकाओ आणि माल्टामध्ये अनेक कंपन्यांची नोंदणी करून बेटिंग ॲपचा कारभार चालवला. गुन्ह्यातून कमावलेल्या पैशातून शाह आणि त्याच्या कुटुंबीयांनी दुबईमध्ये महागड्या मालमत्ता खरेदी केल्या. शेकडो कोटींची मनी लॉन्ड्रिंग आणि बनावट ट्रेडिंगद्वारे पैसे परदेशात पाठवले गेले आहेत.
ईडीने यापूर्वीही अनेक ठिकाणी छापेमारी करून रोकड आणि डिजिटल उपकरणे जप्त केली होती. नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान अनेक मालमत्तांवर टाच बसवली होती, तर फेब्रुवारी 2025 मध्ये चिंतन शाह आणि चिराग शाह या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.
या प्रकरणी एप्रिल 2025 मध्ये मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. आतापर्यंत ईडीने एकूण 651 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता जप्त केली आहे. तपास अजूनही सुरू असून, येत्या काळात कंपनीच्या आणखी मालमत्ता जप्त होण्याची शक्यता आहे.

