(संगमेश्वर / प्रतिनिधी)
फुणगुस बाजारपेठ ते मांजरे फाटा हा मुख्य मार्ग दाट झाडीच्या विळख्यात अडकला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंची अनियंत्रित वाढलेली झाडी थेट रस्त्यावर आली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या मार्गाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
या मार्गावरून दररोज शेकडो प्रवासी, विद्यार्थी आणि शेतकरी ये-जा करतात. मात्र झाडीमुळे दृष्यमानता अत्यंत कमी झाली असून अपघाताची शक्यता लक्षणीयरीत्या वाढली आहे. काही ठिकाणी रस्त्याची रुंदी इतकी कमी झाली आहे की समोरून येणारी वाहने वेळेवर दिसत नाहीत, अशी स्थानिकांची नाराजी आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित विभागाचे लक्ष वेधून तात्काळ झाडी छाटणी करून रस्ता सुरळीत करण्याची मागणी केली आहे. अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन झाडीमुक्तीचे काम केल्यास अपघाताचा धोका कमी होईल आणि प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

