(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील तुरळ गावात १९ ऑगस्ट २०२५ रोजी होणारी नियमित ग्रामसभा कोरम पूर्ण न झाल्यामुळे होऊ शकली नाही. मात्र त्यानंतर ११ सप्टेंबर २०२५ रोजी तहकूब सभा घेण्यात आली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून गावातील महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आयोजित सभा गावचे सरपंच सहदेव सुवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत ग्रामस्थांनी प्रोसीडिंगच्या सर्व मुद्यांवर विचारमंथन केले, यामध्ये गावातील तांत्रिक, सामाजिक आणि आर्थिक बाबींचा समावेश होता. विशेष म्हणजे या सभेत तंटामुक्त अध्यक्षाची निवड देखील करण्यात आली. तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी श्रीकांत झिलु डिके यांची निवड विरोधाभासी चर्चेनंतर निश्चित करण्यात आली.
सभेत उपस्थित गावातील प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये गावचे प्रमुख झिलू राजका डिके, आर डी सी बँक संचालक राजेंद्रजी सुर्वे, माजी सभापती कृष्णाजी हरेकर, तुरळ गावचे पोलीस पाटील वर्षा सुर्वे हरेकर, पो.पा. संजय ओकटे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष जाधव यांचा समावेश होता. एकूण ११५ मान्यवर ग्रामस्थ या सभेला हजर होते. यामुळे तहकूब सभेची उपस्थिती आणि महत्त्व अधोरेखित झाले.
ग्रामसभेत झालेल्या चर्चेत गावातील विकासकामांचे नियोजन, सार्वजनिक सुविधांची सुधारणा, तसेच समाजातील तंटामुक्ती आणि शांतता राखण्याचे उपाय यावर विशेष भर देण्यात आला. उपस्थित ग्रामस्थांनी सक्रिय सहभागातून गावातील निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता आणि सामूहिक जबाबदारी याची खात्री करून दिली. या तहकूब सभेत ग्रामस्थांच्या सहभागातून आणि गावातील वरिष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली गावच्या भविष्यासाठी ठोस आणि दीर्घकालीन निर्णय घेण्यात आले, ज्यामुळे तुरळ गावाच्या सामाजिक व आर्थिक विकासात सकारात्मक बदल अपेक्षित आहेत.

