(देवळे / प्रकाश चाळके)
सध्या सोशल मीडियावर जुन्या नोटा आणि नाण्यांच्या खरेदीसंदर्भातील रील्सचा अक्षरशः पाउस पडत आहे. “ट्रॅक्टर वाली पाच रुपयांची नोट लाखो-कोटींना विकत घेऊ”, “जुनी कॉइनला प्रचंड मागणी”, “आरबीआय थेट खरेदी करते” असे दावा करणारे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र हे व्हिडिओ सत्य आहेत की जनतेची फसवणूक करण्याचा डाव, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
या रील्समध्ये काही व्यक्ती स्वतःला “खरेदीदार” म्हणून दाखवत घरपोच येऊन नोट आणि नाणी घेऊन रोख रक्कम देण्याचे आश्वासन देतात. काहीजण तर या व्यवहाराला आरबीआयची मान्यता आहे असेही सांगतात. परंतु प्रत्यक्षात अशा नोटा-नाण्यांची अशी खरेदी अधिकृतरीत्या होत असल्याचे कोणतेही प्रमाण उपलब्ध नाही. त्यामुळे हे सर्व व्हिडिओ आर्थिक फसवणुकीची नांदी तर नाहीत ना, असा सवाल नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
जनतेचा सर्वात मोठा प्रश्न असा की, “या दाव्यांची पडताळणी कोण करणार? आणि हे व्हिडिओ खोटे असल्यास फसवणूक कोण थांबवणार?”
सोशल मीडियावर वाढत चाललेल्या या प्रकारामुळे लोकांमध्ये चिंता पसरली आहे. जर हे दावे असत्य आणि दिशाभूल करणारे असतील, तर लोकांचे बँक खाते किंवा वैयक्तिक माहिती घेऊन फसवणुकीचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे या प्रकरणाकडे सक्षम यंत्रणांनी गंभीरपणे लक्ष देण्याची गरज असल्याचे जनतेचे मत आहे.
नागरिकांनी मागणी केली आहे की, संबंधित सायबर विभागाने या व्हिडिओंची सखोल चौकशी करावी. आरबीआयने अधिकृत निवेदन देऊन या दाव्यांचे सत्य-असत्य स्पष्ट करावे. जर हे व्हिडिओ फसवणूक करणारे असतील तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तात्काळ बंदी घालावी.
ट्रॅक्टरच्या चित्रासह असलेली ५ रुपयांची नोट विकून लाखो रुपये मिळतील, ही अफवा असल्याचे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. याची सत्यता पडताळल्यानंतर असे दिसून आले आहे की, सोशल मीडियावर अशा प्रकारच्या खोट्या आणि फसव्या रील्स आहेत, ज्यामुळे अनेक लोक फसले जात आहे. अशा रील्सवर विश्वास ठेवू नका आणि कोणत्याही वैयक्तिक माहितीची मागणी करणाऱ्या वेबसाइटवर खात्री न करता माहिती शेअर करू नका.
तसेच जुन्या नोटा-नाण्यांच्या खरेदीबाबत सत्य परिस्थिती स्पष्ट करण्याची आणि संभाव्य फसवणूक रोखण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांनी त्वरित घ्यावी, अशी जोरदार मागणीही जनतेतून होत आहे.

