(संगमेश्वर / दिनेश अंब्रे)
दि. १ ऑक्टोबर रोजी रामपेठ अंगणवाडीत लहान गट व मोठा गट यांच्यासाठी दांडिया नृत्य व फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
मोठ्या गटातील स्पर्धेत अंगणवाडी सेविका सौ. पल्लवी सचिन शेरे यांनी २ ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त ‘स्वच्छता थीम’ वर सादरीकरण करून समाजप्रबोधन केले. I.C.D.S. पोषण अभियान, स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियानांतर्गत स्वच्छता जनजागृतीचे महत्त्व त्यांच्या अभिनयातून प्रभावीपणे मांडण्यात आले.
या स्पर्धेत पल्लवी शेरे यांनी सादर केलेल्या ‘स्वच्छता थीम’ ला बक्षिस मिळाले. सौ. शेरे या नेहमीच शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतात तसेच आपल्या विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहित करतात. त्यामुळे रामपेठ अंगणवाडी विविध उपक्रमांत नेहमीच आघाडीवर राहते.
कार्यक्रमानिमित्त ICDS प्रकल्प अधिकारी (देवरूख) मा. विनोदकुमार शिंदे, बीट सुपरवायझर सौ. आर. आर. प्रभुघाटे, उपसरपंच मा. विवेक शेरे, ग्रामविकास अधिकारी मा. संजय शेलार यांनी उपस्थित राहून सौ. पल्लवी शेरे यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी बीट सुपरवायझर सौ. प्रभुघाटे यांचे मार्गदर्शन लाभले. पालकांनी अंगणवाडीत होणारे वार्षिक कार्यक्रम, आहारस्तुती व विविध उपक्रमांचे विशेष कौतुक केले.

