(गुहागर)
तालुक्यातील वेळणेश्वर येथे ४५ वर्षीय व्यक्तीने काजूच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक तपासात दारूच्या नशेत हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
विठ्ठल उमलु चव्हाण (वय ४५, मूळ रा. बम्मण जोगी, सिंदगी, जि. विजापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते सध्या वेळणेश्वर येथील इंजिनिअरिंग कॉलेजसमोर वास्तव्यास होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान ही घटना घडली. वेळणेश्वर येथील माळरानावरील काजूच्या झाडाच्या फांदीला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे सायंकाळी उघडकीस आले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
प्राथमिक माहितीनुसार, दारूच्या नशेत असताना हे कृत्य झाले असावे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी १५ फेब्रुवारी रोजी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये नोंद करून पोलीस पुढील तपास करत आहेत.

