(रत्नागिरी)
भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील करिअर कट्टा विभाग आणि समाजशास्त्र विभागाने, आयक्यूएसी (IQAC) च्या सहकार्याने विदर्भातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी संकलनाचा सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविला.
दिनांक १८ ते १९ नोव्हेंबर २०२५ या दोन दिवसांत महाविद्यालय परिसरासह रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेत विद्यार्थ्यांनी निधी संकलन मोहीम राबवली. या उपक्रमाची सुरुवात महाविद्यालयातूनच करण्यात आली. महाविद्यालयातील प्राध्यापकांनीही पुढाकार घेत देणग्या देऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. या उपक्रमामागील मूळ उद्देश म्हणजे विदर्भातील नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करणाऱ्या शेतकरी बांधवांना आर्थिक मदत करणे हा होता.
या मानवतावादी मोहिमेत करिअर कट्टा संसदेचे ११ विद्यार्थी आणि समाजशास्त्र विभागातील प्रथम वर्षाचे ६ विद्यार्थी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी नागरिकांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. नागरिकांनीही विद्यार्थ्यांच्या सेवाभावी कार्याला मनापासून प्रतिसाद देत उदारपणे देणग्या दिल्या.
महाविद्यालयाने राबविलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव, संवेदनशीलता आणि मदतीची प्रेरणा अधिक दृढ झाली. नागरिकांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांनी निधी संकलन मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली.

