(राजापूर / तुषार पाचलकर)
तालुक्यातील राजापूर–शीळ–गोठणे–सौंदळ तसेच राजापूर–डोंगर–सागवे (प्रजिमा क्रमांक ६८ व ७२) या महत्त्वाच्या मार्गांची स्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट झाली आहे. रस्त्यावरील खोल व धोकादायक खड्ड्यांमुळे वाहनचालक, विद्यार्थी, शेतकरी ते पर्यटकांपर्यंत सर्वांनाच मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या मार्गांवरून कोंढेतड, शेडे, डोंगर, विल्ये, नाणार, कुंभवडे, सागवे, जैतापूर आदी गावांकडे मोठी वाहतूक होत असल्याने हा परिसर वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जाणारा हा मुख्य मार्ग असल्याने पर्यटकांचीही सतत वर्दळ असते; मात्र खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवास जीवघेणा ठरत आहे.
खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार, रिक्षाचालक आणि चारचाकी चालकांसाठी धोका अधिकच वाढला आहे. प्रवाशांना होणारा शारीरिक त्रास, तसेच वारंवार नादुरुस्त होणारी वाहने यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे. याशिवाय रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झाडीमुळे वाहनांची दृश्यमानता कमी झाली असून अपघातांची शक्यता प्रचंड वाढली आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत कोंढे तर्फे राजापूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व सामाजिक युवा कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांनी १९ नोव्हेंबर रोजी राजापूर उपविभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना लेखी निवेदन देऊन तातडीने रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी केली.
“पुढील एका महिन्यात खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत न केल्यास आणि कडेला वाढलेली झाडी न कापल्यास आम्हाला उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल.” असा इशारा त्यांनी दिला आहे. स्थानिक नागरिकांनीही रस्त्यांची बिकट अवस्था लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी मागणी केली आहे.

