(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यात प्रस्तावित अप्पर तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय पाचल येथेच स्थापन करण्यात यावे, या मागणीला दिवसेंदिवस व्यापक लोकसमर्थन मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) राजापूर तालुका सरचिटणीस रवींद्र सप्रे, कारगिल युद्धातील माजी सैनिक प्रवीण पांडुरंग नारकर तसेच युवा उद्योजक सोहन विश्राम सुतार यांनी पाचलच्या बाजूने ठाम भूमिका मांडत शासनाने लोकभावना आणि उपलब्ध सुविधा लक्षात घेऊन पाचलच योग्य ठिकाण असे ठाम मत व्यक्त केले आहे.
रवींद्र सप्रे म्हणाले की, राजापूर पूर्व विभागातील सुमारे ९० टक्के जनता पाचलच्या बाजूने आहे. पाचल हे शिक्षण, बाजारपेठ, बँका, दळणवळण, शासकीय सेवा आणि इतर मूलभूत सुविधांनी सुसज्ज असे मध्यवर्ती केंद्र आहे. त्यामुळे अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी पाचल हा सर्वात योग्य पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “ही मागणी कोणत्याही गावाच्या विरोधातील नसून संपूर्ण दुर्गम पूर्व विभागातील नागरिकांच्या सोयीसाठी आहे. शासनाने जनभावना, भौगोलिक परिस्थिती आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन निर्णय घ्यावा.” रायपाटणमध्ये अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर झाल्याचा दावा केला जात असेल, तर त्यासाठी पुन्हा समर्थन गोळा करण्याची गरज का भासत आहे, असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, कारगिल युद्धात योगदान दिलेले तसेच सध्या पोलीस दलात कार्यरत असलेले पाचलचे सुपुत्र प्रवीण पांडुरंग नारकर यांनीही पाचलच्या मागणीला पाठिंबा दिला. देशसेवेत २४ वर्षे योगदान दिलेल्या नारकर यांनी पाचल हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण असून येथे सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याने अप्पर तहसीलदार कार्यालय पाचलमध्येच व्हावे, असे मत व्यक्त केले.
युवा उद्योजक सोहन विश्राम सुतार यांनी पाचलच्या विकासाचा सविस्तर आराखडाच मांडला. त्यांच्या मते, अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू झाल्यास परिसरातील औद्योगिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल.
त्यांनी सांगितले की, कार्यालय सुरू झाल्यास नवीन लघुउद्योग, कृषीपूरक उद्योग आणि स्टार्टअप्सना आवश्यक शासकीय परवानग्या स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील. त्यामुळे उद्योजकांचा वेळ आणि खर्च वाचेल तसेच गुंतवणुकीला चालना मिळेल. विद्यार्थ्यांना जातीचे, उत्पन्नाचे, निवासी तसेच इतर शैक्षणिक दाखले मिळवण्यासाठी राजापूरपर्यंत वारंवार जावे लागणार नाही. स्थानिक पातळीवरच प्रशासकीय सेवा उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा दिलासा मिळेल.
तसेच शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी होणाऱ्या हेलपाट्यांपासून कायमची मुक्तता मिळेल. युवकांना शासकीय योजना, स्वयंरोजगार आणि कर्जप्रकरणांची पूर्तता अधिक वेगाने करता येईल, त्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पाचल हे भौगोलिकदृष्ट्या राजापूर पूर्व विभागाचे मध्यवर्ती ठिकाण असून येथून सर्व भागात दळणवळणाची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्याबरोबरच नागरिकांची गैरसोय कमी होणार असल्याने अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी पाचल हाच सर्वाधिक योग्य पर्याय असल्याचे मत विविध स्तरातून व्यक्त होत आहे.

