(जैतापूर / राजन लाड)
३४ वर्षे प्रामाणिक, निष्ठावान आणि समर्पित शासकीय सेवा बजावणारे राजेंद्र भानजी हे ३० मे रोजी नियत वयोमानानुसार सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवा कार्यात त्यांनी अनेक महत्त्वाची पदे जबाबदारीने पार पाडली असून, त्यांच्या कर्तृत्वाची प्रशंसा सर्वच स्तरांतून होत आहे.
जबाबदारीची पदे आणि योगदान
राजेंद्र भानजी यांनी आपल्या दीर्घ सेवाकाळात खालील पदांवर जबाबदारी पार पाडली – ६ वर्षे: विधानसभा विभाग, १५ वर्षे: उपमुख्यमंत्री कार्यालय, ६ वर्षे: प्रधान सचिव, विधानसभा यांचे स्वीय सहायक, ४ वर्षे: अध्यक्ष, पंचायत राज समिती यांचे स्वीय सहायक, ३ वर्षे: अध्यक्ष, इतर मागासवर्गीय समिती यांचे स्वीय सहायक
त्यांच्या सेवाकाळात त्यांनी प्रामाणिकपणा, संयम आणि सहकार्याची भूमिका निभावत लोकाभिमुख प्रशासनाचे उदाहरण घालून दिले. त्यांच्या कार्यशैलीमुळे सहकाऱ्यांमध्ये स्नेह, वरिष्ठांमध्ये विश्वास आणि जनतेमध्ये आदराचे स्थान निर्माण झाले.
राजेंद्र भानजी यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. राजापूर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, जैतापूर येथून त्यांनी शालेय शिक्षण घेतले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी शासन सेवेत यशस्वी कारकीर्द घडवली.
सेवेत असताना त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था, ग्रामीण भागातील शाळा व सेवाभावी संस्थांना योजनांद्वारे लाभ मिळवून देण्यासाठी मदत केली. गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्याची त्यांची सामाजिक बांधिलकी उल्लेखनीय ठरली आहे.
वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथील मूळ रहिवासी असलेले भानजी हे राजापूर तालुक्यातील जैतापूर भागाशी जिव्हाळ्याने जोडले गेले. सेवेनंतरही या परिसरातील सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग कायम राहणार आहे, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.
भानजी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त विधानसभा विभागातील वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी व जैतापूर परिसरातील मित्रपरिवाराने त्यांना स्नेहपूर्वक निरोप दिला. त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.