(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यात अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू असताना पाचल तालुका निर्मिती कृती समितीने नागरिकांना अफवा आणि गैरसमजांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सध्या प्रसिद्ध करण्यात आलेली अधिसूचना ही केवळ ‘प्रारूप फेरबदल’ (Draft Modification) संदर्भातील असून, हा अंतिम शासन निर्णय नसल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
समितीच्या म्हणण्यानुसार, शासनाने नागरिकांच्या हरकती आणि सूचना जाणून घेण्यासाठी ही प्रक्रिया सुरू केली आहे. प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांचा विचार करून संबंधित विभागाकडून अहवाल तयार केला जाईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
समितीने दावा केला आहे की, उपलब्ध अधिकृत कागदपत्रांनुसार पाचल हे अप्पर तहसील कार्यालयासाठी सर्व बाबतीत सक्षम आणि योग्य केंद्र आहे. येथे मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, शासकीय विश्रामगृह, शासकीय धान्य गोदाम, महावितरण कार्यालय, शैक्षणिक संस्था, खाजगी रुग्णालये, राष्ट्रीयीकृत व सहकारी बँका, पतसंस्था, मोठी बाजारपेठ, एस.टी. बसस्थानक तसेच महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक १५० यांसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याचे समितीने नमूद केले आहे.
याशिवाय तहसीलदार, राजापूर, उपविभागीय अधिकारी, राजापूर आणि जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी आपल्या अहवालांमध्ये पाचल येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याची सकारात्मक शिफारस केल्याचा दावा समितीने केला आहे. तसेच कोकण विभागीय आयुक्तांच्या अहवालातही पाचलमधील उपलब्ध सुविधा, भौगोलिक स्थिती आणि प्रशासकीय गरज अधोरेखित करण्यात आल्याचे समितीने म्हटले आहे.
पाचल परिसरातील वाढती लोकसंख्या, महसुली गावांचा विस्तार, शेतकरी व नागरिकांच्या वाढत्या प्रशासकीय कामांचा विचार करता, अप्पर तहसील कार्यालयाची गरज पाचल येथे अधिक ठळक असल्याचे मतही समितीने व्यक्त केले आहे.
“सध्या सुरू असलेली प्रक्रिया ही अंतिम निर्णय नसून नागरिकांना आपली भूमिका मांडण्याची संधी आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता वस्तुस्थिती जाणून घ्यावी आणि आवश्यक असल्यास नियमानुसार हरकत किंवा सूचना नोंदवावी. पाचल परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकजूट राहावे,” असे आवाहन पाचल तालुका निर्मिती कृती समितीने केले आहे.

