(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल गाव हे परिसरातील जवळपास ४० ते ४५ गावांसाठी प्रमुख आणि गजबजलेली बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. दैनंदिन गरजा, खरेदी-विक्री आणि विविध कामांसाठी मोठ्या संख्येने नागरिक या बाजारपेठेत ये-जा करत असतात. मात्र, सध्या या परिसरात गावठी दारू विक्री आणि मद्यधुंद व्यक्तींमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सकाळी सात वाजल्यापासूनच काही परगावातील व्यक्ती गावठी दारूचे सेवन करून बाजारपेठेत पडलेल्या अवस्थेत दिसून येतात. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या या प्रकारामुळे बाजारपेठेच्या प्रतिमेलाही धक्का बसत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या संदर्भात अनेक वेळा एक्साईज विभागाकडे तक्रारी करण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी संबंधित अवैध धंद्यांवर कोणताही ठोस परिणाम झालेला दिसून येत नसल्याची नाराजी ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
तसेच, गावठी दारू विक्रीविरोधात पोलीस प्रशासनाकडूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. “पोलीस प्रशासन मुग गिळून गप्प बसले आहे का?” असा सवालही ग्रामस्थ उपस्थित करत असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून अवैध दारू विक्री बंद करावी आणि बाजारपेठेतील वातावरण सुरक्षित करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

