(रत्नागिरी / प्रतिनिधी)
देवरुख परिसरात घडलेल्या सोने व्यापाऱ्याच्या अपहरण आणि लूटप्रकरणी प्रमुख सूत्रधार मानल्या जाणाऱ्या सागर प्रकाश कदम (वय ३४, रा. कदमवाडी, हातखंबा) याचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळत त्याला मोठा धक्का दिला आहे. मागील दोन महिन्यांपासून फरारी असलेल्या कदम याचा पोलीस कसून शोध घेत असून, न्यायालयाच्या निर्णयामुळे या फरार मुख्य संशयितावर अटकेची तलवार आणखी धारदार झाली आहे.
गेल्या १७ सप्टेंबरच्या रात्री देवरुख–साखरपा मार्गावरील वांझोळे येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेत सोने व्यापारी धनंजय केतकर यांचे अपहरण करून त्यांच्याकडील सुमारे १४ लाख रुपये किमतीचे सोने आणि २० हजार रुपयांची रोकड दरोडेखोरांकडून लुटण्यात आली होती. तोंडाला काळा बुरखा लावून आलेल्या अपहरणकर्त्यांनी केतकर यांना इरटीगा गाडीत ठेऊन जबरदस्ती पळवून नेले. लूटीनंतर केतकर यांना वाटूळ येथील पुलाखाली सोडून देत संशयित पसार झाले. या घटनेनंतर देवरुख पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आतापर्यंत चार जणांना अटक झाली असून त्यांच्या चौकशीत सागर कदम हा संपूर्ण टोळीचा मास्टरमाईंड असल्याचे उघड झाले आहे.
सागर कदमने अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करताना “स्वतःचा गुन्ह्याशी संबंध नसून आरोप खोटे आहेत, तसेच आपण प्रतिष्ठित कुटुंबातील असल्याने तपासात अडथळा आणणार नाही,” असा दावा केला होता. मात्र, पोलिसांनी न्यायालयात कदम हा गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचा ठोस दाखला सादर केला. गुन्ह्याचे गांभीर्य, त्यातील संशयिताची भूमिका आणि फरारी असण्याच्या स्थितीचा विचार करून न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयाच्या निर्णयामुळे देवरुख पोलिसांसमोरील फरार मुख्य संशयिताला तातडीने जेरबंद करण्याचे आव्हान आणखी वाढले आहे.

