(संगमेश्वर)
संगमेश्वर व परिसरातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मदार–तिरुवनंतपुरम स्पेशल ट्रेनला संगमेश्वर स्थानकावर अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी या गाडीला येथे थांबा नसल्याने स्थानिकांना प्रवासासाठी चिपळूण किंवा इतर स्थानकांवर अवलंबून राहावे लागत होते.
या निर्णयामुळे दैनंदिन प्रवास, लांब पल्ल्याच्या गाड्यांशी जोडणी तसेच पर्यटकांच्या सोयींमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. विशेषतः केरळ, कर्नाटक आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा थांबा उपयुक्त ठरणार आहे.
या थांब्यासाठी ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुप’च्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. या संदर्भात पद्मश्री गजानन माने यांच्या अध्यक्षतेखाली कोकण रेल्वेचे CMD संतोष कुमार झा यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत संगमेश्वर थांब्याची मागणी ठामपणे मांडण्यात आली होती आणि लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असे आश्वासन देण्यात आले होते.
अखेर या प्रयत्नांना यश मिळाले असून, संबंधित गाडीच्या संगमेश्वर थांब्याबाबत अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे संगमेश्वर, चिपळूण आणि आसपासच्या गावांतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
संगमेश्वरवासियांनी या निर्णयाचे स्वागत करत, रेल्वे प्रशासन व पाठपुरावा करणाऱ्या सर्व संस्थांचे आभार मानले आहेत. आगामी काळात अशाच प्रकारे इतर गाड्यांचेही थांबे मिळावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

