(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या वगडेफाटा ते कोंडये ग्रामपंचायत या सुमारे चार ते पाच किलोमीटरच्या रस्त्याचे काम सध्या गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. गेली दोन ते तीन वर्षे अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या या कामामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, ठेकेदाराची मनमानी आणि प्रशासनाची संशयास्पद निष्क्रियता यावर आता उघडपणे संताप व्यक्त केला जात आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही रस्त्याची अवस्था जैसे थे असल्याने, प्रशासन नेमके कोणाच्या दबावाखाली काम करत आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पालकमंत्र्यांचा पाठपुरावा, ठेकेदाराकडून निष्काळजीपणा
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विशेष पाठपुरावा करून या रस्त्यासाठी तब्बल ४.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. मात्र, जनतेच्या सोयीसाठी उपलब्ध झालेल्या या निधीचा योग्य वापर होत नसल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे.
रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, नियम धाब्यावर बसवून केवळ वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ठेकेदाराच्या या मुजोरीकडे संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या रखडलेल्या कामाचा परिणाम नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही दिसून आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
वादळी पावसात संपर्क तुटला; ग्रामस्थांचे रात्री श्रमदान
रखडलेल्या कामाचे गंभीर परिणाम शनिवारी रात्री समोर आले. रस्त्यासाठी करण्यात आलेल्या डोंगर कटिंगमुळे जमीन भुसभुशीत झाली असून, वादळी पावसात कोंडये गावाजवळ एक मोठे झाड मुळासकट उखडून रस्त्यावर कोसळले. त्यामुळे दोन ते तीन गावे आणि १५ ते २० वाड्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला. एसटी बसच्या फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.
या संकटाच्या वेळी प्रशासनाकडून कोणतीही तत्पर मदत न मिळाल्याने कोंडये गावचे सरपंच महेश देसाई, माजी सरपंच सुरेश दसम, राजाराम पड्ये, लवू दसम आणि सुनील दसम यांनी पावसाची पर्वा न करता हातात कुऱ्हाड आणि कोयते घेऊन रात्रीच्या अंधारात रस्ता मोकळा केला.
अपघातांचा वाढता धोका
रस्त्याच्या कडेला जागोजागी दगड टाकून ठेवण्यात आल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या स्थितीत असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. कारपेट, सिलकोट, गटारे आणि साईडपट्टीची कामे जाणीवपूर्वक रखडवून ठेवण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
“सरकारी तिजोरीतून कोट्यवधी रुपये खर्च होऊनही आम्हाला खड्डे, धोकादायक रस्ते आणि मृत्यूच्या सावटाखाली प्रवास करावा लागत असेल, तर अशा प्रशासनाचा उपयोग काय?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, तातडीने रस्त्याची पाहणी करून दोषींवर कारवाई करण्यात आली नाही, तर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

