(संगमेश्वर / प्रतिनिधी)
शुक्रवारी बाजारपेठ बंद असताना संगमेश्वर बाजार परिसरात एअरटेल कंपनीकडून अचानक पाइप टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. हे काम करताना काँक्रिटीकरण केलेला मुख्य रस्ता खोदल्याने स्थानिक ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.
या खोदकामामुळे बाजारपेठेतील रस्त्यावर खड्डे पडले असून, पाण्याच्या लाईनला धक्का बसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षांनी या रस्त्यावर सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले होते. त्यामुळे स्थानिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, “हा रस्ता पुन्हा पूर्ववत करणार का?”
येत्या २८ एप्रिल रोजी संगमेश्वर येथील प्रसिद्ध निनावी देवी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा होणार असताना, कोणतीही पूर्व सूचना न देता अशा प्रकारचे खोदकाम करणे निषेधार्ह असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बाजारपेठेतील नागरी सुविधा आधीच अपुऱ्या असून, लोकसंख्याही घटत चालल्याने व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. अशा कामांमुळे बाजारपेठेची अवस्था आणखीनच बिकट होत असल्याची भावना लोकांमध्ये आहे.