(नवी मुंबई)
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) २५ डिसेंबर २०२५ पासून व्यावसायिक उड्डाणांसाठी खुले होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी झालेल्या उद्घाटनानंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेला आणि सोयीला प्राधान्य देत विमानतळ टप्प्याटप्प्याने सुरू होण्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. NMIA सुरू होताच मुंबई महानगर क्षेत्राच्या वाढत्या हवाई वाहतूक गरजांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पहिल्या महिन्यात विमानतळ सकाळी आठ ते रात्री आठ या १२ तासांच्या कालावधीत कार्यरत राहील आणि दररोज २३ नियोजित उड्डाणांचे प्रस्थान करेल. दर तासाला जास्तीत जास्त १० फ्लाइट मूव्हमेंट्सची क्षमता ठेवण्यात आली आहे. उद्घाटनाच्या दिवशी इंडिगोचे 6E460 हे विमान बेंगळुरूहून सकाळी आठ वाजता NMIA वर उतरून पहिले आगमन करेल, तर 6E882 हे विमान सकाळी ८:४० वाजता हैदराबादकडे उड्डाण घेऊन विमानतळावरून पहिली अधिकृत प्रस्थान सेवा म्हणून नोंदवले जाईल.
प्रारंभी इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस आणि आकासा एअर या कंपन्यांच्या फ्लाइट्स उपलब्ध राहतील आणि मुंबईची १६ प्रमुख देशांतर्गत शहरांशी जोडणी करण्यात होईल. येणाऱ्या फेब्रुवारी २०२६ पासून वाढत्या मागणीचा विचार करता विमानतळ २४x७ कार्यान्वित केले जाईल आणि दररोजच्या प्रस्थानांची संख्या ३४ पर्यंत वाढवली जाईल. विमानतळाची सुरळीत सुरुवात सुनिश्चित करण्यासाठी NMIA ने सर्व एअरलाइन भागीदार, सुरक्षा यंत्रणा आणि संबंधित विभागांच्या सहकार्याने व्यापक ऑपरेशनल रेडिनेस अँड एअरपोर्ट ट्रान्सफर (ORAT) चाचण्या पूर्ण केल्या आहेत. तसेच, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची (CISF) नियुक्ती २९ ऑक्टोबर २०२५ रोजी NMIA मध्ये औपचारिकरित्या करण्यात आली असून, ते विमानतळावरील प्रमुख सुरक्षा जबाबदाऱ्या बजावतील. NMIA प्रकल्पाची अंमलबजावणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रायव्हेट लिमिटेड (NMIAL) या विशेष उद्देश वाहनामार्फत (SPV) केली जात आहे.
सदर प्रकल्प सार्वजनिक–खाजगी भागीदारी (PPP)तत्वावर राबवला जात असून, यात मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) अर्थात अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्स लिमिटेड (AAHL) यांचा ७४ टक्के हिस्सा आहे, तर उर्वरित २६ टक्के हिस्सा महाराष्ट्र सरकारचे उपक्रम असलेल्या CIDCO कडे आहे. IATA कोड NMI आणि ICAO कोड VANM असलेला NMIA विमानतळ मुंबई महानगर क्षेत्र आणि पश्चिम भारतातील वाढत्या हवाई वाहतुकीला पूरक ठरणार आहे.
१,१६० हेक्टर क्षेत्रावर विकसित करण्यात आलेल्या या ग्रीनफिल्ड विमानतळाला पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यावर दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी हाताळण्याची क्षमता असेल. दोन समांतर धावपट्ट्या, अत्याधुनिक टर्मिनल इमारती, प्रगत मालवाहतूक सुविधा आणि उच्च दर्जाच्या प्रवासी सेवांसह NMIA अखंड अनुभव मिळेल. भारताच्या राष्ट्रीय फूल कमळापासून प्रेरित वास्तुशैली, नवीकरणीय ऊर्जेचा वापर आणि ग्रीन बिल्डिंग पद्धतीमुळे NMIA हे देशातील सर्वाधिक आधुनिक आणि पर्यावरणस्नेही विमानतळ ठरण्याची अपेक्षा आहे.
पहिल्या टप्प्यात विमानतळ दरवर्षी २० दशलक्ष प्रवासी आणि ०.५ दशलक्ष मेट्रिक टन कार्गो हाताळू शकेल. आधुनिक पायाभूत सुविधा, रणनीतिक स्थान आणि अत्यंत उच्च कार्यक्षमतेमुळे NMIA भारताचे एक नवे प्रमुख हवाई प्रवेशद्वार आणि जागतिक विमान वाहतूक क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण केंद्र होण्यासाठी सज्ज आहे.

