(मुंबई)
दक्षिण मुंबईतील सी.पी. टँक सर्कलजवळ सोमवारी दुपारी एका १८ वर्षीय तरुणीचा ट्रकच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. सिया छाजेड असे या तरुणीचे नाव असून ती आपल्या मैत्रिणीसोबत स्कूटरवरून जात असताना अपघात घडला. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला अटक करण्यात आली आहे.
अपघाताची सविस्तर माहिती २८ एप्रिल रोजी दुपारी सिया छाजेड आणि तिची मैत्रीण दिनिका बाफना सी.पी. टँक सर्कलजवळ सुझुकी अॅक्सेस स्कूटरवरून जात होत्या. स्कूटर चालवत असलेल्या दिनिकाने भरधाव वेगात उजव्या बाजूने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अचानक ब्रेक लावल्याने स्कूटर घसरली आणि दोघीही खाली पडल्या. यावेळी मागे बसलेली सिया ट्रकच्या चाकाखाली आली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्कूटर चालवत असलेल्या दिनिकाने तात्काळ सियाला उचलून रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. तिला प्रथम सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला.
सिया खेतवाडी येथील जरीवाला बिल्डिंग-१ मध्ये राहत होती. ट्रकचालकाविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल ट्रकचालक सुभाष नवलकिशन सिंग याने अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला आणि मोबाईलही बंद केला. पोलिसांनी त्याला सीसीटीव्हीच्या आधारे शोधून काढले आणि अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (BNS) व मोटार वाहन कायदा यांच्या खालील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १०६(१): निष्काळजीपणामुळे मृत्यू कलम २८१: अविचारीपणे वाहन चालवणे कलम १२५(१): मानवी जीवन धोक्यात आणणे मोटार वाहन कायद्याचे कलम ३ आणि १३४(अ)(ब) आदी कलमे लावण्पयात आली आहेत. या अपघातानंतर परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. अपघाताचा एक व्हिडिओही समोर आला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.