(मंडणगड)
प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारे येथे पंचायत समिती मंडणगड व मंडणगड आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ रोजी कर्करोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषद रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले. त्यांनी उपस्थित रुग्णांशी संवाद साधत शिबीर प्रभावीपणे राबविण्यासाठी वैद्यकीय पथकाला मार्गदर्शन केले.
शिबिरासाठी वालावलकर हॉस्पिटल, डेरवण येथील अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित होती. कार्यक्षेत्रातील एकूण १०७ नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेतला. या प्रसंगी पंचायत समिती मंडणगडचे गटविकास अधिकारी खरात आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गावंडे यांनी नागरिकांना कर्करोग विषयक जनजागृती, लवकर निदानाचे महत्त्व आणि प्रतिबंधात्मक उपाय यांची माहिती दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कंकाळ यांनी उपस्थित मान्यवर, नागरिक आणि वैद्यकीय टीमचे आभार मानले. शिबीर यशस्वी करण्यासाठी केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

