(पुणे)
बंदी घातलेल्या संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या झुबेर हंगरगेकर या आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीच्या घरावर छापा टाकून एटीएस अधिकाऱ्यांनी संशयास्पद साहित्य, दस्तऐवज आणि गुन्हेगारी कारवायांशी संबंधित कागदपत्रे जप्त केल्याची माहिती दिली आहे. अलीकडेच महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) इसिस मॉड्यूलशी संबंधित प्रकरणात पुण्यात छापेमारी केली होती. या दरम्यान झुबेर हंगरगेकरची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्यावर लक्ष ठेवून एटीएसने सोमवारी स्वतंत्र गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.
९ ऑक्टोबर २०२५ रोजी एटीएसने पुण्यातील विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली होती. या कारवाईत अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आले. तपासादरम्यान उघडकीस आलेल्या पुराव्यांनुसार, बेकायदेशीर हालचाली (प्रतिबंध) अधिनियम, १९६७ (सुधारित २००८) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
बॉम्बस्फोट कटाचा उलगडा?
काही दिवसांपूर्वी कोंढवा, मोमीनपुरा आणि शहरातील विविध भागांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांनी छापेमारी करून १८ जणांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणात आरोपींनी मुंबई, पुणे आणि गुजरातमधील काही भागांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. तपासात उघड झाले की, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील जंगलात त्यांनी बॉम्ब चाचण्या घेतल्या होत्या, तसेच कोंढवा परिसरात बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण दिलं होतं. या पार्श्वभूमीवर एटीएसने झुबेर हंगरगेकरला अटक केली असून, त्याच्याकडून काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये मिळालेल्या व्हिडिओ फुटेजच्या आधारे त्याच्या देशविघातक कृतींमध्ये सहभागाचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
पुण्यातील कोंढवा परिसरावर तपास यंत्रणांचं विशेष लक्ष आहे. २०२३ मध्ये या परिसरातून इसिसशी संबंधित तिघा संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांना बॉम्ब बनवण्याचं साहित्य, ड्रोनचे भाग आणि इतर संशयास्पद वस्तू सापडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या परिसरातील हालचालींवर तपास संस्था बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

