(मुंबई)
चिपळूण तालुका सरपंच संघटनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. संघटनेच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन यावेळी रविंद्र चव्हाण यांनी दिले.
या भेटीदरम्यान भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजप नेते वैभव खेडेकर, सहदेव बेटकर, रत्नागिरी दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, भाजपचे जिल्हा चिटणीस तथा चिपळूण तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के, जिल्हा कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत जाधव, भाजप चिपळूण ग्रामीण महिला मोर्चाच्या अध्यक्षा तथा भिलेच्या सरपंच आदिती गुडेकर, सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष सुहास भागडे, सचिव विकास गमरे, सहसचिव सदानंद पवार, सदस्य श्रेया वीरकर, नम्रता मोहिते, सल्लागार संदीप जाबरे, मालघरचे सरपंच तथा सल्लागार सुनील वाजे यांच्यासह चिपळूण तालुक्यातील अनेक सरपंच उपस्थित होते.
यावेळी सरपंचांना मार्गदर्शन करताना रविंद्र चव्हाण म्हणाले, “सरपंच म्हणून आपण गावाच्या विकासाचे नेतृत्व करत आहात. आपल्या गावाचे रूप पालटण्याचा निर्धार ठेवून काम करा. विकासकामांसाठी जेव्हा मदत किंवा मार्गदर्शनाची गरज भासेल, तेव्हा मी निश्चितपणे तुमच्या पाठीशी उभा राहीन.”
बैठकीत ग्रामीण विकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली असून, सरपंच संघटनेने मांडलेल्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्याची ग्वाही प्रदेशाध्यक्षांनी दिली.

