(नवी दिल्ली)
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि थेट खिशाला चाट देणारी बातमी समोर आली आहे. रेल्वे विभागाच्या नियमानुसार आता ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक सामान घेऊन प्रवास केल्यास प्रवाशांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. विमानप्रवासाप्रमाणेच रेल्वेमध्येही ओव्हर लगेजसाठी पैसे मोजावे लागतील, त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले की, ट्रेनने प्रवास करताना मोफत नेण्याच्या सामानाची मर्यादा ही पूर्वीपासूनच निश्चित असून त्यापेक्षा अधिक वजनाचे सामान असल्यास नियमांनुसार अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.
रेल्वेच्या नियमानुसार प्रवाशाने कोणत्या वर्गातून प्रवास केला आहे, यावर त्याच्याकडे असणाऱ्या सामानाची कमाल मर्यादा ठरते. सेकंड क्लासने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जास्तीत जास्त ३५ किलोपर्यंतचे सामान मोफत नेण्याची परवानगी आहे. स्लीपर क्लासमधील प्रवाशांसाठी ही मर्यादा ४० किलो निश्चित करण्यात आली आहे. तसेच एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही जास्तीत जास्त ४० किलोपर्यंतचे सामान मोफत नेता येते. या मर्यादेपेक्षा अधिक सामान असल्यास प्रवाशांना ओव्हर लगेज चार्ज भरावा लागणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या मते, जादा सामानामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर परिणाम होतो, डब्यांमध्ये अडथळा निर्माण होतो तसेच इतर प्रवाश्यांना त्रास होतो, ट्रेनची साफसफाई आणि देखभाल वाढते. याशिवाय, अतिरिक्त भारामुळे रेल्वेच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच हा नियम अधिक काटेकोरपणे लागू करण्यात येत असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या सामानाचे वजन तपासावे आणि ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सामान असल्यास रेल्वे पार्सल सेवेचा वापर करावा, असा सल्लाही देण्यात आला आहे. अन्यथा प्रवासादरम्यान दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. एकूणच, Railway Luggage Rules अधिक कडक झाल्याने ट्रेनने प्रवास करताना नियमांचे पालन करणे आता अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.

