(लांजा)
वडिलोपार्जित जागेवरील सुरू असलेल्या कौटुंबिक वादाने बुधवारी उशिरा रात्री थरारक वळण घेतले. शहरातील वैभव वसाहतीत सख्खे चुलते आणि चुलत भावांमध्ये झालेल्या रागाच्या झटक्यात हाणामारीपर्यंत मजल गेली. या प्रकरणी दोन्ही कुटुंबांनी लांजा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी नोंदवल्या आहेत.
राजीव अनिल मोरे (४०) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, वडिलोपार्जित जमिनीवरून सुरू असलेल्या वादामुळे त्यांच्या वडिलांनी न्यायालयात दावा दाखल केला असून त्याची नोटीस चुलते प्रदीप मोरे यांना मिळाल्यानंतर वाद अधिक चिघळला. याच संतापातून चुलत भाऊ पृथ्वीराज प्रदीप मोरे (३५) हा बुधवारी सायंकाळी घरात घुसून शिवीगाळ करत अनिल मोरे यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आणखी एक फिर्याद दिल्यानंतर रात्री पुन्हा हाणामारी होत पृथ्वीराजने अनिल मोरे यांना मारहाण केल्याचे तसेच राजीव मोरे यांच्या हाताच्या करंगळीला दाताने चावा घेत जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या आधारे पृथ्वीराज मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रत्युत्तरादाखल ज्ञानदा पृथ्वीराज मोरे (२९) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत वेगळे चित्र मांडण्यात आले आहे. जागेविषयी सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री राजीव मोरे आणि अनिल मोरे घरात घुसून स्वतःस तसेच पती पृथ्वीराज यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राजीव मोरे यांनी ढकलून झालेल्या धक्क्यात ज्ञानदा या जखमी झाल्या असून भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पृथ्वीराज यांच्या डाव्या डोळ्यावर राजीव यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर अनिल मोरे यांनी लाकडी फळीने पृथ्वीराज यांच्या पायांवर प्रहार केल्याचेही त्यांनी सांगितले. जखमी पृथ्वीराज यांना प्रथम लांजा ग्रामीण रुग्णालयात तर पुढील उपचारांसाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या फिर्यादीवरून राजीव मोरे आणि अनिल मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे करीत आहेत.

