(नवी दिल्ली)
भारत हा वेगाने विकसित होणारा देश असून अनेक क्षेत्रांमध्ये झपाट्याने प्रगती करत आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रही याला अपवाद नाही. नव्या तंत्रज्ञानामुळे ऑटोमोबाईल सेक्टर अधिक आधुनिक, प्रगत आणि वापरकर्त्यांसाठी सुरक्षित होत आहे.
याच पार्श्वभूमीवर, आज आपण ऑटोमोबाईल क्षेत्रातील एका नव्या आणि चर्चेत असलेल्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घेणार आहोत. आजवर आपण ट्यूबलेस टायर पाहिले, वापरले; परंतु आता भारतात एअरलेस टायरची एन्ट्री झाली आहे. हे तंत्रज्ञान आल्यानंतर वाहन सुरक्षा, मेंटेनन्स आणि परफॉर्मन्सच्या चर्चेला वेग आला आहे.
एअरलेस टायर्स फक्त मोटरसायकलसाठीच नव्हे तर मोठ्या वाहनांसाठीही उपलब्ध होत आहेत. त्यामुळे ते भविष्यात पारंपरिक टायर्सना सक्षम पर्याय ठरू शकतात. चला तर जाणून घेऊया या एअरलेस टायर्सचे फायदे, तोटे आणि अंदाजित किंमत.
एअरलेस टायरचे तोटे
राइड कम्फर्ट कमी: खडबडीत रस्त्यांवर प्रवास करताना धक्के जास्त बसतात, कारण या टायरचा जमिनीशी अधिक थेट संपर्क येतो.
मायलेज कमी होण्याची शक्यता: एअरलेस टायर्समध्ये ड्रॅग जास्त असल्याने इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी लवकर संपते, तर पेट्रोल/डिझेल वाहनांचे मायलेज कमी होऊ शकते.
वाढलेले कंपन आणि आवाज: सततच्या घर्षणामुळे वाहन चालवताना कंपन आणि टायरचा आवाज वाढतो. इलेक्ट्रिक कारमध्ये इंजिन आवाज नसल्याने हा आवाज अधिक जाणवू शकतो.
एअरलेस टायरचे फायदे
पंचरला पूर्णविराम: या टायर्समध्ये हवा नसल्यामुळे हवा कमी होणे, पंचर होणे किंवा टायर ब्लास्ट होणे यांसारख्या समस्या कायमच्या संपतात.
टिकाऊ आणि मजबूत: विशेष रबर स्पोक्स आणि बेल्टमुळे टायरची मजबुती आणि आयुष्य वाढते.
शून्य मेंटेनन्स: हवा भरणे किंवा वारंवार तपासणी करण्याची गरज नसल्याने देखभालीचा खर्च शून्य.
आकर्षक डिझाइन: टायरची अंतर्गत रचना उघड्या डोळ्यांनी दिसते, ज्यामुळे लूक आधुनिक आणि स्टायलिश वाटतो.
लाँग ड्राईव्ह आणि ऑफ-रोडिंगसाठी उत्तम: कठीण रस्त्यांवरही हे टायर्स चांगले परफॉर्मन्स देऊ शकतात.
किंमत काय आहे?
उपलब्ध माहितीनुसार, भारतीय बाजारात एअरलेस टायरची किंमत साधारण ₹10,000 पासून ₹20,000 पर्यंतचे दरम्यान आहे. ट्यूबलेस टायर्सच्या तुलनेत ही किंमत जास्त असली तरी तंत्रज्ञान नवीन असल्यामुळे दर पुढील काळात कमी होण्याची शक्यता आहे.

