( रत्नागिरी / प्रतिनिधी )
तालुक्यात थिबा राजाकालीन बुद्ध विहार बचाव संघर्ष समितीच्या वतीने बौद्ध समाजात ढवळून निघत असलेले वातावरण दिनांक 27 ऑक्टोबर रोजी काढण्यात आलेल्या विराट मोर्चामधून शासन- प्रशासनाच्या समोर आले. हा मोर्चा यशस्वी होऊन तब्बल दहा दिवस उलटल्यानंतर मोर्चादरम्यान करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक वक्तव्यांप्रकरणी कळझोंडी येथील प्रमोद प्रकाश पवार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संघर्ष समितीच्या सहा जणांवर गुन्हे दाखल केले आहे. या कारवाईमुळे आता पुन्हा समाजात प्रचंड संताप उसळण्याची शक्यता आहे.
संघर्ष समितीने कम्युनिटी सेंटर रद्द करून आरक्षित जागेवरील उठवलेले आरक्षण पूर्ववत करण्याची आणि ती जागा समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी करत मोर्चा काढला होता. शासन प्रशासन आणि संबंधित ट्रस्टविरोधात संतप्त भावनेतून हजारो बांधव रस्त्यावर उतरले होते. मात्र या मोर्चाची सांगता करण्यापूर्वी सभेमधील पदाधिकाऱ्यांच्या भाषणांमधून समाजात खदखदत असलेली भडास वक्त्यांनी बाहेर काढली. याच पार्श्वभूमीवर प्रमोद प्रकाश पवार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रमोद पवार यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, 27 ऑक्टोबर 2025 रोजी संघर्ष समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने अटी व शर्थींवर परवानगी दिलेल्या या मोर्चानंतर झालेल्या सभेमध्ये काही पदाधिकाऱ्यांनी बौध्दजन पंचायत समिती रत्नागिरी या संघटनेचे तसेच थिबा राजा कालीन बुध्दविहार विकास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तसेच कळझोंडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रकाश रामचंद्र पवार यांच्याविषयी असभ्य, मानहानीकारक आणि वातावरण दूषित करणारी भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच काही व्यक्तींनी आक्षेपार्ह पोस्टही केल्याने समाजात संभ्रम निर्माण झाल्याचे प्रमोद पवार यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर संघर्ष समितीतील काही पदाधिकाऱ्यांनीही सभेत प्रक्षोभक वक्तव्ये केली असल्याचे तक्रारीत नमूद आहे. या सभेचे अधिकृत चित्रीकरण शासनाकडे उपलब्ध असून, मोर्चा परवानगीतील नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान मोर्चा काढून दहा दिवस उलटल्यानंतर पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे नोंदविल्याने समाजात उद्रेकाची स्थिती निर्माण झाली आहे. शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४२४/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३५६(२), ३५२, ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३)/१३५ अन्वये दाखल करण्यात आलेला हा गुन्हा २७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ ते २ वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मेन गेटजवळ घडला असल्याची नोंद आहे. हा गुन्हा ८ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री २१.२३ वाजता दाखल करण्यात आला असून, संघर्ष समितीचे अध्यक्ष एल. व्ही. पवार यांच्यासह कार्याध्यक्ष अनंत सावंत, अनिल जाधव, किशोर पवार, अमोल जाधव आणि राजेश सावंत या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.
दरम्यान पोलिसांच्या कारवाईमुळे बौद्ध समाजातील बांधवांमध्ये तीव्र असंतोष असून प्रशासनाच्या भूमिकेविरोधात नापसंतीचे सूर अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यापूर्वी पोलिसांनी वस्तुस्थितीची सर्व बाजूंनी सखोल पडताळणी केली असती, तर कारवाईला अधिक भक्कम आधार मिळाला असता, अशीही मतप्रवृत्ती व्यक्त होत आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर समाजपातळीवर निर्माण झालेला तीव्र संताप आणि काही गैरकारभार करणाऱ्या असंतुष्ट घटकांच्या भूमिकेमुळे समाजात सलोख्याचे वातावरण बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अशा परिस्थितीस जबाबदार कोण ठरणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

