( मुंबई )
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली असून, शुक्रवार 17 जुलै 2026 च्या मध्यरात्रीपासून सुधारित भाडेदर राज्यभर लागू करण्यात आले आहेत. वाढत्या इंधन दर, कर्मचाऱ्यांचे वेतन, वाहनांच्या देखभालीचा खर्च आणि सुटे भाग महागल्यामुळे वाढलेल्या आर्थिक भाराचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. मात्र, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि इतर सवलतधारक प्रवाशांना मिळणाऱ्या विद्यमान सवलतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून, त्यांना पूर्वीप्रमाणेच सवलतीचा लाभ मिळत राहणार आहे.
एसटी महामंडळाच्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ झाली आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते, वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च, टायर, सुटे भाग आणि इतर साहित्याच्या किमती वाढल्याने महामंडळाच्या आर्थिक ताणात मोठी भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर महसूल वाढवण्यासाठी आणि एसटीची आर्थिक घडी मजबूत करण्यासाठी तिकीट दरात सुधारणा करण्यात आली आहे. यासोबतच साध्या बससाठी लागू असलेली 10 टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली असून, आता सर्व प्रवाशांकडून केवळ नव्या सुधारित दरानुसारच भाडे आकारले जाणार आहे.
भाडेवाढीच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल, याची काळजी घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंडित एसटी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही दरवाढ आवश्यक होती. प्रवाशांनी यापुढेही एसटीवर विश्वास कायम ठेवावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती गेल्या काही महिन्यांपासून चिंताजनक बनली आहे. एप्रिल 2026 मध्ये महामंडळाला सुमारे 76 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. वाढत्या इंधन खर्चामुळे भविष्यात तिकीट दरवाढ अपरिहार्य ठरू शकते, असे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यापूर्वीच दिले होते. त्यानंतर अखेर राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर भाडेवाढ लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, ही भाडेवाढ आषाढी वारीच्या काळात लागू झाल्याने ग्रामीण भागातून एसटीने प्रवास करणाऱ्या वारकरी, भाविक, नोकरदार, विद्यार्थी आणि शेतकरी वर्गावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. विशेषतः पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी ही दरवाढ खर्चिक ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे. एसटी महामंडळाने प्रवासी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांना अधिक प्रवास खर्चासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. महागाईचा सामना करणा-या प्रवाशांना दरवाढीची झळ पोहोचणार आहे. आधीच महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत, त्यातच आता प्रवासभाडेही वाढवल्याने प्रवाशांना अधिक आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.
एमएसआरटीसी हे देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बस सेवा महामंडळांपैकी एक असून, महामंडळाच्या ताफ्यात 14 हजारांहून अधिक बस आहेत. दररोज 55 लाखांहून अधिक प्रवासी एसटी सेवेचा लाभ घेतात. त्यामुळे या भाडेवाढीचा परिणाम राज्यातील लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावर होणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रवासखर्चातही वाढ होणार आहे.

