(शेन्झेन)
चीनमधील वैज्ञानिक आता मानवी आयुष्य थेट १५० वर्षांपर्यंत वाढवू शकणारी गोळी विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहेत. शेन्झेन येथील लॉनवी बायोसायन्सेस ही बायोटेक कंपनी या औषधावर संशोधन करत असून, त्यात प्रोस्यानिडिन C1 (PCC1) हा द्राक्षाच्या बियांच्या अर्कामधील नैसर्गिक घटक मुख्य भूमिका बजावतो. कंपनीचा दावा आहे की PCC1 कमकुवत आणि वृद्ध होत असलेल्या पेशी नष्ट करताना निरोगी पेशींचे संरक्षण करते, त्यामुळे शरीराची एकूण कार्यक्षमता सुधारून मानवी आयुष्य मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
हे संशोधन २०२१ मध्ये नेचर मेटाबोलिझम या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासावर आधारित असून त्याची चाचणी उंदरांवर करण्यात आली होती. यात PCC1 ने उंदरांच्या जुन्या पेशी निवडकपणे नष्ट करताना निरोगी पेशी कायम ठेवण्यात यश मिळवले आणि त्यांचे सरासरी आयुर्मान ९ टक्क्यांनी वाढले. उपचारानंतरचे आयुष्य तर तब्बल ६४.२ टक्क्यांनी जास्त असल्याचे आढळले. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यिप त्सझो यांनी या गोळीला “लॉन्गेव्हिटी सायन्सचा होली ग्रेल” असे संबोधत, निरोगी जीवनशैलीसह १५० वर्षांपर्यंत जगणे काही वर्षांत वास्तव ठरू शकते, असा दावा केला आहे. कंपनी आता मानवी स्वरूपातील गोळी विकसित करण्याच्या अंतिम टप्प्यावर आहे.
तथापि, इतर वैज्ञानिकांनी या दाव्यांबाबत सावध भूमिका घेतली आहे. बक इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन एजिंगमधील तज्ज्ञांच्या मते, उंदरांमध्ये दिसलेले परिणाम आशादायक असले तरी ते माणसांमध्ये तितक्याच प्रमाणात साध्य करणे अत्यंत कठीण आहे. अशा औषधाची परिणामकारकता आणि सुरक्षितता सिद्ध करण्यासाठी मोठ्या व दीर्घकालीन क्लिनिकल चाचण्या अनिवार्य आहेत आणि माणसाचे आयुष्य इतक्या मोठ्या प्रमाणात वाढवण्याच्या दाव्यासाठी ठोस वैज्ञानिक पुरावे आवश्यक आहेत.
चीनमध्ये दीर्घायुष्य संशोधनाला सरकारी आणि खासगी पातळीवर मोठा पाठिंबा मिळत असून, या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू आहे. जगभरात अँटी-एजिंग संशोधनाचा वेग वाढला असला तरी प्रत्यक्ष यश मिळण्यासाठी अजून बराच वेळ लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर डॉक्टरांचे मत आहे की वैज्ञानिक दावा काहीही असला, तरी सध्या निरोगी आहार, नियमित व्यायाम आणि चांगल्या सवयी, हेच खऱ्या अर्थाने प्रभावी अँटी-एजिंग उपाय आहेत.

