( पाटणा )
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने द्विशतकाचा टप्पा पार करत दणदणीत विजय मिळवला आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी सत्ताधारी आघाडीने अधिक चांगली कामगिरी करीत २४३ पैकी २०२ जागा जिंकत निर्णायक आघाडी घेतली. त्यामुळे महागठबंधनला केवळ ३५ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत भाजपाने एनडीए म्हणून जरी निवडणूक लढली असली तरी यामध्ये भाजपा मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत ज्याप्रमाणे काँग्रेससोबत महागठबंधनचे पानिपत झाले आहे.
निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार याबाबत राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. भाजप आणि जदयूच्या जागा जवळपास समान असल्याने, तसेच नितीश कुमार यांच्या ‘पलटूराम’ राजकीय शैलीचा उल्लेख करत ते पुन्हा एकदा नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत भाजपची अंतिम रणनिती काय असेल, हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तसेच या विजयानंतर बिहारला सलग 20 वर्षे स्थिर सरकार देणारे व पंचाहत्तरी ओलांडलेले नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसणार की भाजप नवा चेहरा देणार यावर अद्याप स्पष्टता नाही.
कोणत्या पक्षाला किती जागा
भाजप – 90
जदयू – 84
लोकजनशक्ती – 19
राजद – 25
काँग्रेस – 6
इतर पक्ष आणि अपक्ष – 19
जनसुराज – 0
एकून – 243
काय आहे 2020 ची आकडेवारी
भाजप-74
जदयू-43
लोकजनशक्ती-1
राजद-75
काँग्रेस-19
इतर-29
एनडीएच्या विजयामागे महिला रोजगार योजनेचा निर्णायक वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या योजनेत पात्र महिलांना १० हजार रुपये देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या योजनेचे उद्घाटन झाले होते आणि त्याचा लाभ तब्बल दीड कोटी महिलांनी घेतला.
महिलांचे मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून मतदान करण्याचे चित्र यंदा स्पष्ट दिसले. पुरुषांपेक्षा (62.8%) महिलांचे मतदान 8.8% ने अधिक (71.6%) होते. परिणामी, 1951 नंतर सर्वाधिक 66.91% मतदान बिहारमध्ये नोंदले गेले. या वाढलेल्या महिला मतांचा सर्वाधिक फायदा नितीश कुमार यांच्या जदयूला झाला. मागील निवडणुकीत 43 जागांवर राहिलेल्या जदयूने यंदा दुपटीने वाढत 84 जागा जिंकल्या. भाजपनेही आपली ताकद वाढवत 20 जागांची भर घातली.
लोकजनशक्ती पक्षाने तर अभूतपूर्व झेप घेत गेल्या वेळच्या 1 जागेवरून थेट 19 जागांपर्यंत मजल मारली. दुसरीकडे, राजदची कामगिरी मोठ्या प्रमाणात घसरली आणि त्यांना 50 जागांची घट सहन करावी लागली. मतचोरी, एसआयआर आणि निवडणूक आयोगावर टीका करण्यात व्यस्त असलेल्या राहुल गांधींना मतदारांनी स्पष्टपणे नाकारल्याने काँग्रेसचा आकडा 19 वरून 6 जागांवर घसरला, हा पक्षाचा मागील 30 वर्षांतील सर्वात निच्चांकी आकडा ठरला. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या ‘जनसुराज’ पक्षालाही मतदारांनी दाद न दिल्याने त्यांना एकही जागा मिळवता आली नाही.

