(नवी दिल्ली)
देशातील प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) अंतर्गत ३१ मार्च २०२६ पर्यंत एकूण ५७ कोटी ९९ लाख बँक खाती उघडण्यात आली आहेत. मात्र यापैकी ४२ कोटी ८२ लाख खातीच कार्यरत असून सुमारे १५ कोटी १७ लाख खाती निष्क्रिय असल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने माहिती अधिकार (RTI) अंतर्गत दिली आहे.
नागपूर येथील सामाजिक कार्यकर्ते संजय थुल यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत ही आकडेवारी मागवली होती. त्यावर वित्तीय सेवा विभागातील केंद्रीय जनमाहिती अधिकारी सुरेंद्र कुमार यांनी अधिकृत उत्तर दिले आहे.
अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत ३१ मार्च २०२६ पर्यंत एकूण ₹३,१०,६२२.७० कोटी इतकी रक्कम खात्यांमध्ये जमा आहे. जनधन खात्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यात आले असले तरी काही खाती दीर्घकाळ वापरात नसल्याचे समोर आले आहे.
प्रधानमंत्री जनधन योजना ही देशातील आर्थिक समावेशन वाढवण्यासाठी ऑगस्ट २०१४ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शून्य शिल्लक खात्याची सुविधा, रुपे डेबिट कार्ड, अपघात विमा संरक्षण आणि थेट लाभ हस्तांतरण (DBT) यांसारख्या सुविधा दिल्या जातात.
सरकारच्या उद्देशानुसार, ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना औपचारिक बँकिंग प्रणालीशी जोडणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर खाती निष्क्रिय असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत असल्याने या खात्यांच्या सक्रियतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

