(नागपूर)
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि विदर्भातील प्रभावी राजकारणी दत्ता मेघे यांचे रविवारी सायंकाळी वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती माजी उपमहापौर रघुनाथ मलिकार यांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. दत्ता मेघे हे हिंगणा मतदारसंघाचे आमदार संदीप मेघे आणि माजी विधान परिषद सदस्य सागर मेघे यांचे वडील होते. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
चार वेळा खासदार, राज्यसभेतही प्रतिनिधित्व
दत्ता मेघे यांनी नागपूर, रामटेक आणि वर्धा लोकसभा मतदारसंघांतून चार वेळा काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून येत आपली राजकीय ताकद सिद्ध केली. 2002 ते 2008 या कालावधीत त्यांनी राज्यसभा सदस्य म्हणूनही काम केले. 1999 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे 2014 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांनी राज्यमंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली होती.
शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान
राजकारणासोबतच शिक्षण क्षेत्रातही दत्ता मेघे यांनी भरीव कामगिरी केली. ‘नागर युवक शिक्षण संस्था’ आणि ‘दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ यांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. अनेक गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, वैद्यकीय मदत आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी आयुष्यभर सेवा केली. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना ‘दाताभाऊ’ म्हणूनही ओळख मिळाली.
राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली
दत्ता मेघे यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत, “सेवाभावी आणि दातृत्वाची वृत्ती जोपासणारे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आपण गमावले,” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. त्यांनी पुढे सांगितले की, दत्ताभाऊंनी राजकारणाच्या माध्यमातून सामान्य माणसासाठी काम करण्याचे संस्कार दिले आणि शिक्षण-आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान दिले.
दत्ता मेघे यांच्या निधनाने विदर्भात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या कार्याचा ठसा दीर्घकाळ लक्षात राहील.

