कार्तिक महिन्यानंतर सुरू होणारा मार्गशीर्ष महिना हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानला जातो. हा महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना मानला जातो आणि यामध्ये प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केलं जाते. या व्रतामुळे भक्तांना समृद्धी, वैभव आणि लक्ष्मीदेवीची विशेष कृपा लाभते, अशी मान्यता आहे. त्यामुळे अनेक महिला या महिन्यात मार्गशीर्ष गुरुवार व्रत पाळून देवीची मनोभावे पूजा करतात.
मार्गशीर्ष महिना 2025 कधीपासून?
2025 मध्ये मार्गशीर्ष महिन्यात हे गुरुवार येतात :
- पहिला गुरूवार – 27 नोव्हेंबर
- दुसरा गुरूवार – 4 डिसेंबर
- तिसरा गुरूवार – 11 डिसेंबर
- चौथा गुरूवार – 18 डिसेंबर
धार्मिक महत्त्व
प्राचीन धर्मग्रंथांनुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यांसाठी विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की सत्ययुगाची सुरुवात याच महिन्यात झाली. मार्गशीर्ष गुरुवारी केलेल्या व्रताने लक्ष्मी आणि विष्णू (लक्ष्मी-नारायण) यांची विशेष कृपा प्राप्त होते. या व्रताची सुरुवात महिन्यातील पहिल्या गुरुवारी होत असून, शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. हे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते. नवविवाहित जोडपेही सुख-समृद्धी आणि सद्भावनेसाठी मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत पाळतात. इच्छापूर्ती, ऐश्वर्य, धनप्राप्ती आणि गृहशांतीसाठी हे व्रत अत्यंत फलदायी मानले जाते.
मार्गशीर्ष गुरुवार : पूजा करण्याची पद्धत
- सकाळी लवकर उठून स्नान करावे.
- चौरंग किंवा पाटावर लाल कापड पसरवून त्यावर तांदळावर तांब्याचा कलश स्थापित करावा.
- कलशात पाणी भरून त्यात दुर्वा, नाणे, सुपारी ठेवावी.
- कलशाला हळदी-कुंकू लावून त्यावर आंब्याची किंवा खायची पाने ठेवावीत आणि श्रीफळ स्थापित करावे.
- लाल कापडावर महालक्ष्मी देवीचा फोटो ठेवून विडा, खोबरे, फळे, खडीसाखर आणि गूळ अर्पण करावे.
- महालक्ष्मीची विधीवत पूजा करून कथा वाचन करावे.
- शेवटी गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करून आरती करावी.
-
शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे.
-
सुवासिनी बोलावून हळदी-कुंकू करावे.
मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे.

