(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील रायपाटण (टक्केवाडी) येथील ५० वर्षीय गणेश दत्ताराम पांचाळ हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असून, त्यांनी आत्महत्येचा इशारा देत घरातून निघून गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजताच्या सुमारास, गणेश पांचाळ यांनी आपल्या घरात “मी हरण्या या आजाराला कंटाळून जीवन संपवत आहे. यात कोणाचाही संबंध नाही.” अशी चिठ्ठी लिहून ठेवली. त्यानंतर त्यांनी आपल्या वहिनी वैशाली बाळचंद्र पांचाळ यांना “मी व्हेळ (ता. लांजा) येथे आमच्या नातेवाईकांकडे जातो” असे सांगून घराबाहेर पडले. मात्र, ते तेव्हापासून परत घरी आलेले नाहीत.
बेपत्ता गणेश पांचाळ यांचा आजपर्यंत काहीच मागमूस लागलेला नाही. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यांच्या शोधासाठी राजापूर पोलिस ठाण्यात नापत्ता व्यक्तीची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी रमेश दत्ताराम पाचोळ (वय ४५, रा. रायपाटण, टक्केवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. गणेश पांचाळ यांचा शोध लागल्यास फोन क्रमांक ७६२०४५३२३४ या क्रमांकावर अथवा पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन कुटुंबीयांतर्फे करण्यात आले आहे.

