( राजापूर / तुषार पाचलकर )
राजापूर तालुक्यातील पाचल हे केवळ एक गाव नसून परिसरातील सुमारे ४० गावांचे व्यापारी, शैक्षणिक, सामाजिक आणि प्रशासकीय केंद्र म्हणून विकसित झाले आहे. दररोज हजारो नागरिक, शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि महिला विविध कामांसाठी पाचलमध्ये ये-जा करतात. वाढती लोकसंख्या, व्यापारी उलाढाल आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता येथे स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापन करण्याची मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे.
सध्या पाचल परिसराची जबाबदारी रायपाटण पोलीस दूरक्षेत्रावर असून, या दूरक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विस्तीर्ण कार्यक्षेत्रात कायदा-सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांचा तपास, वाहतूक नियंत्रण तसेच आपत्कालीन घटनांना प्रतिसाद देण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. त्यामुळे नागरिकांना तत्पर आणि प्रभावी पोलीस सेवा देताना मोठा ताण निर्माण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
पाचल परिसरात जिल्हा परिषद गट, चार पंचायत समिती गण आणि २० ते २५ हून अधिक गावांचा समावेश आहे. या विस्तृत भागासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे मत आहे. स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू झाल्यास परिसरातील नागरिकांना जलद सेवा मिळण्यास मदत होईल, तसेच रायपाटण पोलीस दूरक्षेत्रावरील कामाचाही भार कमी होईल.
पाचल ही परिसरातील प्रमुख बाजारपेठ असल्याने येथे आठवडी बाजार, बँका, शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि विविध व्यापारी व्यवहारांमुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. गणेशोत्सव, शिमगा, जत्रा, पालख्या, धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा आणि सामाजिक उपक्रमांच्या वेळी हजारो नागरिक एकत्र येत असल्याने अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची गरज भासते.
याशिवाय परिसरात जंगलाचे प्रमाण अधिक असून रानगवा, बिबट्या आणि रानडुक्कर यांसारख्या वन्यप्राण्यांचा वावर आहे. अनेकदा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी दुर्गम गावांमध्ये दुचाकीवरून गस्त घालावी लागते किंवा तातडीच्या घटनांना प्रतिसाद द्यावा लागतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो.
यामुळे रायपाटण पोलीस दूरक्षेत्रासाठी, तसेच भविष्यात पाचल येथे स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू झाल्यास त्यासाठी आवश्यक चारचाकी गस्ती वाहन उपलब्ध करून द्यावे, अशीही स्थानिकांची मागणी आहे. त्यामुळे दुर्गम भागात सुरक्षित आणि प्रभावी गस्त घालणे, तसेच आपत्कालीन घटनांना अधिक वेगाने प्रतिसाद देणे शक्य होईल.
स्थानिकांच्या मते, पाचल येथे स्वतंत्र पोलीस ठाणे कार्यान्वित झाल्यास संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांना पोलीस सेवा अधिक जलद आणि कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध होईल. वाढती लोकसंख्या, व्यापारी महत्त्व, सार्वजनिक कार्यक्रमांची संख्या, वाहतुकीचा वाढता ताण आणि दुर्गम भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन शासन आणि पोलीस प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे, विविध शासकीय उपक्रमांना पाचलकरांनी नेहमीच सकारात्मक सहकार्य केले आहे. पोलीस विभागाला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक स्तरावरही पूर्ण सहकार्य करण्याची तयारी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

