(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीसमोर रक्तटंचाईचे संकट उभे राहिले असून, वाढत्या रुग्णसंख्येमुळे रक्ताच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. दरवर्षी सरासरी पाच हजार रक्तपिशव्यांचे संकलन करून गरज भागवली जात होती, मात्र आता केवळ मोफत पुरवठ्यासाठीच एवढ्या प्रमाणात रक्त लागते आहे. परिणामी रक्तपेढीसमोर पुरेशा साठ्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
शासनाने सर्व घटकांसाठी उपचार मोफत उपलब्ध करून दिल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयासह अन्य सरकारी दवाखान्यांतील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रक्ताची मागणीही अनेकपटींनी वाढली असून, सध्या रक्तपेढीवर प्रचंड दबाव आहे. या रक्तपेढीतून अपघातग्रस्त रुग्ण, अॅनेमिया, यॅलेसेमिया, कर्करोग, डायलिसिस, शस्त्रक्रिया, प्रसूती (सिझर), माजी सैनिक, तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत रुग्णांना मोफत रक्तपुरवठा केला जातो.
पूर्वी वार्षिक पाच हजार रक्त बॅगांची मागणी असलेली ही रक्तपेढी, आता त्याच प्रमाणात मोफत पुरवठा करत आहे. वाढत्या मागणीचा विचार करता, वर्षभरात सुमारे १४० ते १५० रक्तदान शिबिरांचे आयोजन करून तब्बल सात हजार रक्तपिशव्या संकलित कराव्या लागत आहेत. या कामात रक्तदाते, सामाजिक संस्था, तसेच विविध राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरत आहे. दिवाळीसारख्या दीर्घ सुट्ट्यांच्या काळात रक्तदान शिबिरांची संख्याही घटते, त्यामुळे सध्या रक्तपेढीला रक्तटंचाईचा तीव्र फटका बसला आहे. गंभीर अवस्थेतील रुग्णांना तातडीने रक्ताची आवश्यकता भासत असून, रक्तपेढीकडून नागरिकांना आणि विविध सामाजिक संस्थांना तातडीने रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या रक्तपेढीकडे मर्यादित साठा उपलब्ध असून, गंभीर रुग्णांसाठी रक्ताची तातडीने गरज आहे. नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरांत सहभागी व्हावे, हे केवळ मानवतेचे नव्हे तर समाजसेवेचे कार्य आहे, असे आवाहन रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी केले. रक्तदान ही केवळ दानाची नव्हे, तर जीवन वाचविण्याची कृती आहे. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीसमोर उभ्या राहिलेल्या या तातडीच्या परिस्थितीत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन रक्तदानाच्या माध्यमातून समाजाप्रती आपले कर्तव्य बजावावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

