(रत्नागिरी /प्रतिनिधी)
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या ग्रामसेवकावर अखेर जिल्हा परिषदेने निलंबनाची कारवाई केली आहे. खडीकोळवण येथील ग्रामसेवक हरिदास शिवाजी बंडगर (रा. कवठेमहांकाळ, जि. सांगली) याच्यावर दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून बंडगर याची तिची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि त्यानंतर त्याने तिला विवाहाचे आश्वासन दिले. मात्र, या खोट्या आमिषाखाली त्याने वारंवार शारीरिक संबंध ठेवले. या संबंधातून पीडित तरुणी गर्भवती राहिली. विवाहाचा विषय काढल्यावर बंडगरने तिला विश्वासात घेत एका खासगी रुग्णालयात जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याचा आरोप आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पीडितेने देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी हरिदास बंडगर याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३७६ (बलात्कार) आणि ३१३ (मनाविरुद्ध गर्भपात) अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास देवरुख पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, संगमेश्वर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्याकडे सादर केला. आरोपी ग्रामसेवकावर ४८ तासांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याने नियमांनुसार त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

