(चिपळूण /रत्नागिरी प्रतिनिधी)
येऊ घातलेल्या नगरपरिषद, नगरपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. चिपळूण येथे मंगळवारी झालेल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली. मात्र, याचवेळी त्यांनी कार्यकर्त्यांना “एकसंघतेचा विसर पडू देऊ नका” असा कठोर इशाराही दिला.
मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, तसेच योगेशजी गृहराज्यमंत्री आहेत. आमच्याकडे दररोज सकाळी जिल्ह्याची संपूर्ण माहिती पोहोचते. कोण कुठे जातं, कोणाशी भेटतं, काय बोलतं हे सर्व आम्हाला माहीत असतं. त्यामुळे सकाळी आमच्यासोबत, आणि रात्री दुसरीकडे अशा दुहेरी भूमिका घेतल्यास त्याचा परिणाम महायुतीवर आणि जिल्ह्याच्या राजकारणावर होईल, असे उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून स्पष्ट शब्दांत सांगितले.
बैठकीस शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सामंत म्हणाले, नगरपंचायत, नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या सर्व ठिकाणी महायुतीची सत्ता प्रस्थापित होईल. प्रत्येक ठिकाणी महायुतीचाच भगवा फडकेल, हा संकल्प आपण आज इथून केला पाहिजे.
त्यांनी पुढे सांगितले, प्रत्येक पक्षाच्या कोर कमिटीने आणि समन्वय समित्यांनी एकत्र बसून मतभेद मिटवावेत. आज रत्नागिरी जिल्ह्यातील महायुतीची घोषणा झाली आहे, लवकरच सिंधुदुर्गातही महायुती जाहीर होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण एकत्र येऊन लढवू.
सामंत यांनी यावेळी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर रोज सकाळी टीका करणाऱ्यांना आता उत्तर देण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या युबीटीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थान मिळता कामा नये. महायुतीनेच सत्ता मिळवली पाहिजे, हा निर्धार आपण केला पाहिजे.
https://www.instagram.com/reel/DQ7CNuSE5wF/?igsh=MWMyMTV1dW91M2FvZw==

