(मुंबई)
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. आधुनिक मराठी रंगभूमीला नवी दिशा देणाऱ्या, प्रख्यात दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि अभिनय गुरू विजया मेहता (विजयाबाई) यांचे मंगळवारी रात्री 10 च्या दरम्याने वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी नाट्यसृष्टीतील एका सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली जात असून, संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे.
मराठी रंगभूमीवर ‘विजयाबाई’ म्हणून आदराने ओळखल्या जाणाऱ्या विजया मेहता यांनी आपल्या अद्वितीय दिग्दर्शनशैली, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि प्रयोगशील विचारांमुळे अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. त्यांनी नाना पाटेकर, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी, सुहास जोशी, भारती आचरेकर यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांना अभिनयाचे धडे दिले आणि त्यांना घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रायोगिक रंगभूमीला दिली नवी ओळख
4 नोव्हेंबर 1934 रोजी गुजरातमधील बडोदा येथे विजया जयवंत म्हणून त्यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीत प्रख्यात नाट्यगुरू इब्राहिम अल्काझी आणि आदी मर्झबान यांच्याकडे नाट्यशास्त्राचे शिक्षण घेतले. 1960 च्या दशकात विजय तेंडुलकर, डॉ. श्रीराम लागू आणि अरविंद देशपांडे यांच्यासोबत त्यांनी ‘रंगायन’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली. या संस्थेने मराठीत प्रायोगिक आणि समांतर रंगभूमीची चळवळ उभी करत नाटकांना नवे सौंदर्यशास्त्र आणि वैचारिक दिशा दिली.
‘एक शून्य बाजीराव’ ठरले मैलाचा दगड
सी. टी. खानोलकर लिखित ‘एक शून्य बाजीराव’ हे नाटक त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरले. याशिवाय ‘बॅरिस्टर’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘मुधराक्षस’ आणि ‘सखाराम बाईंडर’ यांसारख्या नाटकांनी मराठी रंगभूमीवर अमिट ठसा उमटवला. रंगभूमीबरोबरच त्यांनी चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘पेस्तनजी’ (1988) हा हिंदी चित्रपट विशेष गाजला. तसेच ‘रावसाहेब’, ‘पार्टी’, ‘कलियुग’ या चित्रपटांमधील त्यांच्या कामाचेही मोठे कौतुक झाले. दूरदर्शनवरील ‘स्मृतिचित्रे’ आणि ‘लाइफलाइन’ या मालिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले. त्यांच्या आत्मचरित्रात्मक लेखनालाही मोठी दाद मिळाली.
अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार
विजया मेहता यांना 1975 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर ‘रावसाहेब’ चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री) मिळाला. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले.
विजया मेहता यांनी अभिनेत्री दुर्गा खोटे यांचे पुत्र हरिन खोटे यांच्याशी विवाह केला होता. त्यांना दोन अपत्ये झाली. हरिन खोटे यांच्या अकाली निधनानंतर त्यांनी फर्रोख मेहता यांच्याशी दुसरा विवाह केला.
कलाविश्वाकडून भावपूर्ण श्रद्धांजली
विजया मेहता यांच्या निधनाची बातमी समोर येताच नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. आधुनिक मराठी रंगभूमीला नवी ओळख देणाऱ्या, अभिनयाला शिस्त आणि विचारांची जोड देणाऱ्या ‘विजयाबाई’ यांच्या जाण्याने भारतीय रंगभूमीतील एका अजरामर पर्वाचा अंत झाल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

