(नवी दिल्ली)
राजधानी दिल्लीमध्ये मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट झाला. सुरुवातीला हा स्फोट पार्क केलेल्या कारमध्ये झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र पोलिसांनी स्पष्ट केले की, स्फोट चालत्या कारमध्ये झाला, ज्यामुळे स्फोटाची तीव्रता अधिक होती. या घटनेत आतापर्यंत ११ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला असून, ३० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. ‘सोमवारी संध्याकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी सिग्नलवर थांबलेल्या एका कारमध्ये स्फोट झाला. कारमध्ये प्रवासीही बसले होते. स्फोटामुळे लगतच्या गाड्यांमध्येही आग लागली’, अशी माहिती पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी दिली.
देशभरात सुरक्षा वाढवली
स्फोटानंतर दिल्लीसह देशभरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांना उच्चस्तरीय सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आदी महानगरांमध्येही हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
कारचा मालक ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा!
स्फोट झालेल्या कारच्या मालकाला दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, घटनेचा तपास गतीमान करण्यात आला आहे. स्पेशल ब्रँच आणि सीपी सतीश गोलचा यांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळावर तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, फोन लोकेशन आणि वाहन क्रमांकाची तपासणी करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. स्फोटात वापरलेली ही कार सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर रजिस्टर्ड असल्याचे पोलिसांना प्राथमिक तपासात आढळले आहे. चौकशीदरम्यान सलमानने पोलिसांना माहिती दिली की, त्याने ही कार बऱ्याच काळापूर्वी दुसऱ्या व्यक्तीला विकली होती. त्यामुळे स्फोट घडला त्या वेळी ही कार आपल्या ताब्यात नव्हती, असे त्याचे म्हणणे आहे. या स्फोटासंदर्भात अपघातस्थळी असलेली हरियाणा पासिंगची हुंडई आय- २० कारचा मालक नदीम खान यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आरटीओशी संपर्क साधून कारच्या नोंदींचा सखोल तपास सुरू केला आहे. आरटीओच्या रेकॉर्डमधून वाहनाची विक्री, हस्तांतरण आणि मालकीची साखळी कधी व कोणाकडे झाली याबाबत माहिती घेण्याचे प्रयत्न पोलिस करत आहेत. स्फोटामागे काही मोठे षडयंत्र असल्याची शक्यता तपासात लक्षात घेतली जात असून, त्यामुळे कारच्या सध्याच्या मालकाची ठोस ओळख पटवणे, तसेच विक्रीचा संपूर्ण इतिहास उघड करणे हा तपासाचा प्राथमिक उद्देश आहे. आरटीओ अहवालातून लगेचच महत्त्वपूर्ण खुलासे होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे, “दिल्लीतील स्फोटात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्या प्रति माझ्या मनःपूर्वक संवेदना. जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना. बाधितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.”
पंतप्रधानांनी गृहमंत्री अमित शाह आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. अमित शाह यांनी जन लोक नायक रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आणि पोलिस अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे की या स्फोटाचा प्रत्येक कोन तपासला जाणार असून, तपासाची संपूर्ण माहिती पारदर्शकपणे जनतेसमोर मांडली जाईल. सध्या एनएसजी, एनआयए आणि दिल्ली पोलिसांची विशेष पथके घटनास्थळी तपास करत आहेत.
दिल्लीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्रमुख शहर आणि जिल्ह्यांतील पोलीस यंत्रणांना अलर्ट मोडवर राहण्याची सूचना केली आहे. तसेच मुंबईत वर्दळीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिसांकडून महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच मुंबईच्या प्रभादेवी येथील अतिमहत्त्वाचं अशा सिद्धीविनायक मंदिराच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. कोणतीही संशयित गोष्ट आढळल्यास पोलिसांकडून लगेच तपास केला जात आहे.
राहुल गांधींकडून दुःख
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले आहे की, “दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार स्फोटाची बातमी अत्यंत वेदनादायक आणि चिंताजनक आहे.” त्यांनी पुढे नमूद केले की, “या दुःखद अपघातात अनेक निर्दोष लोकांच्या मृत्यूची बातमी खूपच दुःखद आहे. या कठीण प्रसंगी मी प्रियजनांना गमावलेल्या शोकाकुल कुटुंबांच्या पाठीशी आहे. सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी माझी आशा आहे.”

