(अहिल्यानगर)
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरील वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी थेट आव्हान देत, “विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस” अशी घोषणा केली. या विधानानंतर विखे समर्थकांनीही आक्रमक भूमिका घेत प्रत्युत्तर दिल्याने संघर्ष तीव्र झाला आहे.
वादग्रस्त वक्तव्य आणि बच्चू कडूंचा इशारा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बोलताना विखे पाटलांनी कथितरित्या म्हटले की, “काही शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लागली आहे.” या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले, “शेतकऱ्यांचा अपमान सहन केला जाणार नाही; जो विखे पाटलांची गाडी फोडेल, त्याला एक लाखाचं बक्षीस देईन.”
विखे समर्थकांचे प्रतिआव्हान
बच्चू कडू यांच्या या वक्तव्यानंतर विखे पाटील समर्थक आणि भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी यांनी प्रतिआव्हान दिलं. त्यांनी म्हटलं, “जो बच्चू कडू यांना काळे फासेल, त्याला दोन लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल.” तसंच, “विखेंची तीन पिढ्या समाजकार्यात आहेत; कडूंनी बोलताना जपून बोलावं. अन्यथा अहिल्यानगर जिल्ह्यात पाय ठेवणं कठीण होईल,” असा इशाराही सोनमाळी यांनी दिला.
मंत्री विखे पाटलांचा संयमाचा सल्ला
वाद चिघळत असताना, राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र संयमाची भूमिका घेत आपल्या समर्थकांना शांततेचं आवाहन केलं. “आपल्या नेत्यांवर टीका झाली की कार्यकर्ते भावनिक होतात, पण अशा कृती टाळाव्यात,” असं त्यांनी सांगितलं. तसेच, “वाद मिटवण्यासाठी मी स्वतः बच्चू कडू यांच्याशी संवाद साधणार आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. या संपूर्ण वादामुळे विखे-कडू संघर्षाचं राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणाची राज्यात खुमासदार चर्चा सुरू आहे.

