(मुंबई)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय निर्णय झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने युतीची घोषणा केली आहे. या युतीमुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले असताना, शिंदे गटाच्या शिवसेनेने दलित मतांचा आधार मिळवण्यासाठी रिपब्लिकन सेनेशी हातमिळवणी केली असल्याची चर्चा आहे.
“रस्त्यावर अन्यायाविरोधात लढणाऱ्या दोन सेनांचा एकत्रित प्रवास आजपासून सुरू झाला आहे,” असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी युतीची घोषणा करताना सांगितले. “बाळासाहेबांची शिवसेना आणि बाबासाहेबांची रिपब्लिकन सेना एकत्र आली आहे. त्यामुळे ही लढाई अधिक बळकट होणार आहे,” असेही ते पुढे म्हणाले.
शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री असतानाही मी ‘कॉमन मॅन’ होतो आणि आज उपमुख्यमंत्री म्हणूनही सामान्य माणसाच्या सेवेतच आहे. आमचं नेतृत्व कार्यकर्ते आणि सामान्य जनतेशी जोडलेलं आहे,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
तर यावेळी बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले, “ही युती आजची नाही, तर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या काळापासून सामाजिक परिवर्तनासाठी सुरू झालेली चळवळ आहे. आम्ही दोघं कार्यकर्ता म्हणून एकत्र आलो आहोत.” त्यांनी स्पष्ट केले की, “आजही मोठा आंबेडकरी समाज रस्त्यावर लढत आहे, पण त्याला सत्ता मिळालेली नाही. आगामी स्थानिक निवडणुकीत त्या कार्यकर्त्याला सत्ता मिळावी, यासाठी ही युती झाली आहे.”
शिंदे आणि आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. यावेळी पत्रकारांनी जागावाटपाविषयी विचारले असता शिंदे म्हणाले, “सध्या जागावाटपाची चिंता नाही. आम्ही मनाने एकत्र आलो आहोत. जागावाटप ही दुय्यम बाब आहे.” त्यामुळे नेमका जागावाटपाचा फॉर्म्युला काय असेल, हे स्पष्ट झालेले नाही.
ही युती केवळ राजकीय नातेसंबंधांची घोषणा नाही, तर दोन प्रभावशाली विचारसरणींचे एकत्रित होणे आहे. त्यामुळे या युतीचा आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काय परिणाम होतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.