भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 च्या Women’s World Cup मध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून विश्वविजेतेपद पटकावले आणि संपूर्ण देशभरात जल्लोष साजरा झाला. या ऐतिहासिक विजयाने प्रत्येक भारतीयाचा अभिमान उंचावला आहे. महिला क्रिकेटपटूंच्या या अद्भुत कामगिरीचा सन्मान करत Tata Motors ने मोठी घोषणा केली असून, विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडूला नवी कोरी Tata Sierra SUV भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही भेट त्यांच्या उत्कृष्ट खेळ, चिकाटी, संघभावना आणि देशाला गौरव मिळवून देणाऱ्या परिश्रमांचा सन्मान म्हणून दिली जाणार आहे.
Tata Motors आपली आयकॉनिक आणि अत्याधुनिक SUV – Tata Sierra २५ नोव्हेंबर रोजी लाँच करणार आहे. ही SUV कंपनीच्या आतापर्यंतच्या सर्वात प्रगत गाड्यांपैकी एक असून, यात आधुनिक एक्सटेरिअर डिझाइन, प्रीमियम इंटिरिअर, तीन डिजिटल स्क्रीन, उत्कृष्ट बसण्याची सोय आणि ड्रायव्हिंग अधिक सुलभ करणारी अत्याधुनिक फीचर्स असतील. कंपनीकडून प्रत्येक खेळाडूला Tata Sierra चा टॉप व्हेरिएंट भेट म्हणून दिला जाणार आहे.
या खेळाडूंमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, रेणुका सिंग, राधा यादव यांच्यासह १६ खेळाडूंचा समावेश आहे. या सर्वांनी अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जबरदस्त खेळ करत भारताला अभूतपूर्व विजय मिळवून दिला.
Tata Motors पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ शैलेश चंद्रा यांनी सांगितले की, “भारतीय महिला क्रिकेट संघाने त्यांच्या अपवादात्मक कामगिरीने देशाचे नाव जगभरात उज्वल केले आहे. या विजेत्या संघाला आमची नवी Tata Sierra SUV भेट देताना आम्हाला अभिमान आणि आनंद वाटतो. हा सन्मान त्यांच्या धैर्य, समर्पण आणि कामगिरीचा गौरव आहे.”
ते पुढे म्हणतात त्यांचा प्रवास हा दृढ निश्चय आणि आत्मविश्वासाच्या शक्तीचे प्रतीक आहे आणि हेच मूल्य प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतात. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्समध्ये आम्हाला अभिमान आहे की आम्ही या शूरवीर खेळाडूंना आणखी एक दिग्गज टाटा सिएरा भेट स्वरूपात देत आहोत. हा आमच्याकडून त्यांच्या जिद्दीला आणि देशाला दिलेल्या गौरवाला वाहिलेला एक खास सन्मान आहे. दोन दिग्गज, एक जिद्द, अनंत प्रेरणा. असं ते शेवटी म्हणतात. टाटा सिएरा ही जबरदस्त फिचर असलेली महागडी कार असून तिची किंमत पंचवीस लाखापेक्षा जास्त आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या या विजयामुळे देशभरात नव्या प्रेरणेची लाट उसळली असून, Tata Motors च्या या निर्णयामुळे महिला क्रीडाक्षेत्राच्या प्रोत्साहनाला नवी उभारी मिळणार आहे.

