(मुंबई)
गुरुपौर्णिमेच्या औचित्यावर मध्य रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा असलेली लोकल सुरू केली असून, गुरुवारपासून ही सुविधा प्रत्यक्षात आली आहे. ही लोकल दिवसातून ७ ते १० वेळा धावणार असून, टप्प्याटप्प्याने सर्व लोकल गाड्यांमध्ये अशा प्रकारचे डबे उपलब्ध करून देण्याचा रेल्वेचा मानस आहे.
मालडब्याचे रुपांतर वरिष्ठांसाठी सन्मानडब्यात
मध्य रेल्वेच्या माटुंगा कारखान्यातील तांत्रिक सुधारणा करून मालडब्याचे रुपांतर आकर्षक अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डब्यात करण्यात आले आहे. या डब्यात १३ आसनी व्यवस्था असून प्रवाशांना उभे राहण्यासाठीही पुरेशी जागा उपलब्ध आहे. दरवाजांखाली आपत्कालीन शिड्या बसवून सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. डबा आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला असून, ज्येष्ठांना सन्मानाने आणि सुरक्षितपणे प्रवास करता यावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
पश्चिम रेल्वेही तयार; १०५ लोकलमध्ये होणार बदल
- मध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वेनेही या सुविधेची अंमलबजावणी सुरू केली आहे.
- १०५ लोकल रेक्समध्ये टप्प्याटप्प्याने हे बदल केले जाणार आहेत.
- प्रत्येक सुधारित डब्यात १३ आसने, उभे राहण्याची जागा आणि चढउतार सुलभ होईल यासाठी विशेष रचना असणार आहे.
- हे काम एक वर्षाच्या आत पूर्ण केले जाईल, असे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
- सध्याचे इतर मालडबे कायम राहतील.
ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात होणाऱ्या अडचणी लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. दिव्यांग प्रवाशांप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठीही स्वतंत्र डब्याची मागणी करण्यात आली होती..यावरून रेल्वे प्रशासनाने न्यायालयात सकारात्मक भूमिका मांडली आणि लवकरात लवकर डबे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते..न्यायालयाच्या सूचनेनंतर दोन्ही रेल्वे विभागांनी यासंदर्भात प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात केली.
५० हजार ज्येष्ठांना दिलासा
- मुंबई उपनगरीय रेल्वेसेवेचा दररोज सुमारे ५० हजार ज्येष्ठ नागरिक वापर करतात.
- गर्दीच्या वेळी बसायला जागा मिळणे तर दूरच, उभे राहणेसुद्धा कठीण होते.
- त्यामुळे स्वतःच्या सन्मानासह आणि सुरक्षिततेसह प्रवास करता येईल, अशी नवी सुविधा आता या नागरिकांसाठी खुली झाली आहे.
- या निर्णयामुळे ज्येष्ठांना दिलासा मिळेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.