रायगडनंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजप–शिवसेना युतीत तणाव उफाळला आहे. आगामी नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष एकत्र लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी थेट भाजप नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर बोट ठेवत “त्यांच्या इच्छाशक्तीअभावी युती शक्य झाली नाही,” असा आरोप केला आहे.
“युती व्हावी म्हणून प्रयत्न केले, पण राणे इच्छुक नव्हते” – दीपक केसरकर
पत्रकारांशी बोलताना दीपक केसरकर म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची मी आणि उदय सामंत यांनी भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी रवींद्र चव्हाण यांना भेटा, अशी सूचना दिली होती. त्यानंतर चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांचीही भेट झाली होती. मात्र पालकमंत्री बहुदा इच्छुक नसावे, असे वाटते आणि त्याच्यामुळे कदाचित युती होऊ शकली नाही. मला त्यांच्याशी अजून बोलण्याची संधी मिळालेली नाही. मात्र, बोलण्याची वेळ आली तर नक्कीच संवाद साधेन.”
या आरोपांना प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी संयमी भूमिका घेतली. ते म्हणाले, “याचे उत्तर मी सिंधुदुर्गमध्ये जाऊनच देईन. तो विषय सिंधुदुर्गपुरता आहे. राज्यभर निवडणुका लागल्या आहेत आणि आम्ही महायुतीचे घटकपक्ष आहोत. त्यामुळे मित्रांशी चर्चा करणे आवश्यक आहे, पण मला आता नाशिकवरून त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही.”
रायगड जिल्ह्यात याआधी शिवसेनेची युती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत फिस्कटली होती. आता सिंधुदुर्गमध्येही भाजप–शिवसेना युती न होण्याने स्थानिक राजकारणात नवीन समीकरणांची शक्यता वाढली आहे.

