(रत्नागिरी /प्रतिनिधी)
नागरिकांना शासकीय सेवा वेळेत, पारदर्शक आणि प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत’ राबविण्यात येणाऱ्या ‘आपले सरकार’ पोर्टलवरील कामगिरीत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने ऑक्टोबर २०२६ मध्येही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विविध ऑनलाइन सेवा पुरविणे आणि नागरिकांकडून मिळालेल्या समाधानाच्या गुणांकनात रत्नागिरी पोलीस दलाने राज्यातील जिल्हा पोलीस दलांमध्ये अग्रस्थान मिळविले आहे.
पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन RAPID’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या अर्जांचा वेळेत निपटारा करण्याबरोबरच सेवा वितरणात पारदर्शकता आणि गुणवत्ता राखण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचे सकारात्मक प्रतिबिंब ऑक्टोबर महिन्याच्या राज्यस्तरीय मूल्यमापनात उमटले आहे. या मूल्यमापनात ‘Overall Top Performing Service’ या श्रेणीत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्याचबरोबर ‘Service with Highest Citizen Score’ या श्रेणीतही अव्वल स्थान पटकावले. ऑक्टोबर महिन्यात रत्नागिरी पोलीस दलाकडे विविध शासकीय सेवांसाठी एकूण १ हजार ९८० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी १ हजार ८७३ अर्जांचा निर्धारित कालावधीत निपटारा करण्यात आला. विशेष म्हणजे, ‘आपले सरकार’ पोर्टलवरील वेळेत सेवा पुरविण्याच्या कामगिरीचा दर्शक असलेल्या ‘Timeliness Score’ मध्ये रत्नागिरी पोलीस दलाने ९.२८ गुण मिळविले आहेत. नागरिकांच्या समाधानाशी संबंधित गुणांकनातही आघाडी कायम राखल्याने सेवा वितरणातील कार्यक्षमतेची नोंद राज्यस्तरावर झाली आहे.
नागरिकांना शासकीय कार्यालयांचे अनावश्यक हेलपाटे टाळता यावेत, अर्जांवर विहित मुदतीत कार्यवाही व्हावी आणि ऑनलाइन सेवांचा लाभ सुलभतेने मिळावा, या उद्देशाने ‘आपले सरकार’ पोर्टल कार्यरत आहे. या व्यवस्थेच्या माध्यमातून नागरिकाभिमुख सेवा देण्याच्या दिशेने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने केलेली कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली आहे. भविष्यातही अधिक जलद, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न कायम राहील, असा विश्वास पोलीस दलाकडून व्यक्त करण्यात आला आहे.


